दोन हजाराच्या नोटेचे आत्मवृत्त | Autobiography Of Two Thousand Rupees In Marathi |
![]() |
दोन हजाराच्या नोटेचे आत्मवृत्त - Autobiography Of Two Thousand Rupees In Marathi. |
मित्र-मैत्रिणींनो आज आपण दोन हजाराच्या नोटेचे आत्मवृत्त बघणार आहोत.
नमस्कार मित्रांनो ओळखलं का मला? काय म्हणता नाही ओळखलं? अहो! टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मीडिया हे सर्व पाहता की नाही? सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली व सर्व सामान्यांची तसेच इतर स्तरातील लोकांची घाबरगुंडी उडवणारी बातमी जी सर्वत्र पसरली आहे त्यातील महत्त्वाचे नाव म्हणजे मी दोन हजारची नोट. आता ओळख पटली ना? तर मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या मनातील काही गोष्टी सांगणार आहे म्हणजेच आज मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगणार आहे.
मी दोन हजाराची नोट म्हणजेच इतर चलनात असलेल्या सर्व नोटांपैकी सर्वात मोठ्या आकाराची नोट. काही वर्षांपूर्वी जेव्हा नोटाबंदी करण्यात आली त्यावेळी माझा जन्म झाला. माझा आकार इतर नोटांपेक्षा तसा जरा मोठाच व माझा रंग फिक्कट लालसर गुलाबी रंगाचा. तशी मी दिसायला इतरांपेक्षा ठसठशीत आणि सुंदर.
मी जेव्हा चलनात आली तेव्हा प्रत्येक जण मला बघण्यासाठी आसुसलेला व आतुरलेला होता. दोन हजाराची नोट कशी बरे असेल हा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात पडलेला होता. मी जेव्हा चलनात आली तेव्हा प्रत्येकजण आपल्याकडे ही दोन हजाराची नोट असावी यासाठी प्रयत्नशील होता.
पैसे जमवायचे म्हटले की अनेक कमी किमतीच्या नोटा स्वतःजवळ ठेवून गर्दी करण्यापेक्षा एकच नोट दोन हजाराची नोट जमा केली की आपले काम सोपे होईल असे प्रत्येकाला वाटू लागले. मग काय मी चलनात आली आणि सर्वत्र मीच दिसू लागली.
कोरी करकरीत इतर नोटांपेक्षा आकाराने त्यातल्या त्यात मोठी अशी दोन हजाराची नोट स्वतःकडे असली की जणू काही प्रत्येकाला एक वेगळा अभिमानच जाणवू लागला. मीही सुरुवातीला खूप आनंदी होती. प्रत्येकाला मी हवीहवीशी होती.परंतु हळू हळू मला माज्यातील काही उणीवा ही इतरांच्या नजरेतून दिसण्यात येऊ लागल्या.
पहिल्यांदा माझ्या काही ठराविक प्रमाणातच नोटा छापाई झाल्या होत्या परंतु जसजसं माझे काम चलनात वाढू लागले तसतसे माझ्या छपाईचे कामही वाढवण्यात आले. मग काय मी दोन हजाराची नोट जणू प्रत्येकाकडेच दिसू लागली. प्रत्येकजण व्यवहारात माझा आवर्जून वापर करू लागला परंतु काही दिवसातच नव्याची नवलाई कमी होताना मला दिसली.
पूर्वी मला बघण्यासाठी व मला स्वतःकडे ठेवण्यासाठी आसुसलेला प्रत्येक व्यक्ती हळूहळू माझ्याकडे पाठ फिरवू लागला. माझ्या छपाई नंतर व मी चलनात आल्यानंतर सर्वात मोठी नाराजी जर कोणाला झाली असेल तर ती बँकेच्या एटीएम मशीनला झाली होती. होय, ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण हेच खरं आहे. बँकेच्या एटीएम मशीन मधून येणाऱ्या पूर्वीच्या नोटा यांचा आकार माझ्या आकारापेक्षा लहान होता परंतु अचानक मी चलनात आल्यानंतर एटीएम मशीनच्या आतील नोटा देण्याचा भाग ही वाढवण्यात आला. मला त्या मशीन मधून ये-जा करण्यात त्रास होऊ लागला.
कोणीही व्यक्ती बाजारात मला म्हणजे 2000 च्या नोटेला घेऊन काही वस्तू आणायला जाऊ लागले तर दुकानदार मला बघून तितकेसे आनंदी होईनासे झाले. व्यवहारात एकमेकांकडे माझा वापर करताना इतकी मोठी नोट का देता? आता उरलेले इतके सुट्टे पैसे कसे काय द्यायचे असे उलट सुलट प्रश्न लोक एकमेकांना विचारू लागले.
खर तर मी इतर नोटांपेक्षा मानाने व किमतीने सर्वात मोठी असली तरी छोट्या मोठ्या गोष्टी विकत घेण्यासाठी माझा काहीच उपयोग होत नव्हता हे मात्र खरे होते. कारण शंभर दोनशे रुपयांच्या वस्तूसाठी दोन हजाराच्या नोटेचे सुट्टे देणे प्रत्येकालाच परवडनासे झाले होते. हळूहळू मलाही माझे नैराश्य येऊ लागले आहे.
काही वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय हा नागरिकांच्या भल्यासाठीच घेतला गेला असून त्या बदल्यात मला दोन हजाराच्या नोटेला चलनात आणण्यात आले होते. परंतु आता मलाही तुमच्याबरोबरच गेल्या दोन-चार दिवसांपूर्वीच कळले आहे की आता मीही चलनातून जाणार आहे. जेव्हापासून मलाही बातमी कळली तेव्हापासूनच मला का बरं चलनातून बाद करत असतील याचा विचार मी सतत करीत आहे.
जशी ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली तसेच समाजातून सर्वत्र तिखट गोड प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मागील वेळी नोटाबंदीच्या निर्णयावरील जसा संमिश्र प्रतिक्रिया समाजातील विविध स्तरावरून उमटल्या होत्या त्याचप्रमाणे यावेळीही मला चलनातून बाद करण्याची बातमी आल्यानंतर तशाच संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
कोणी या निर्णयाचे स्वागत केले तर कोणी या निर्णयाविरुद्ध आपले तिखट मत व्यक्त केले. काही लोक बोलतात की आम्ही तर आजपर्यंत दोन हजाराची नोट पाहिलीच नाही तर काही लोकांच्या मनात आता पुन्हा ती बँकांच्या बाहेर जाऊन उभे राहण्यासाठी मोठीच्या मोठी लाईन आपल्याला लावायला लागणार की काय ही भीती येऊ लागली आहे.
परंतु काही घाबरून जाऊ नका मित्रांनो. मला तुम्ही बँकात जाऊन निर्धास्तपणे भरू शकता किंवा मला देऊन इतर नोटाही बदल करून घेऊ शकता व यासाठी नागरिकांना पुरेसा वेळही देण्यात आला आहे. तेव्हा माझ्या सर्व मित्रांनो तुम्ही जराही घाबरून जाऊ नका, धावपळ करू नका, चलबिचल होऊ नका.
स्वतःची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जर तुमच्याकडे दोन हजाराची नोट असेल तर नक्की ती वेळीच बदलून घ्या. हा निर्णय तुमच्या आणि माझ्या भल्याचा आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून झालेल्या निर्णयाचे मनापासून स्वागत करा.
मित्रांनो आता मी तुमच्या आयुष्यातून कदाचित निघून जाईल किंवा कदाचित पुन्हा ही येईल. मला खरेच नाही माहित की पुढे जाऊन माझे काय होणार आहे. परंतु आज इथे इतके नक्कीच सांगेन की आपली साथ आता फक्त काही महिन्यांचीच आहे. मी तुमची दोन हजाराची नोट जितके वर्ष तुमच्याबरोबर राहिली खूप आनंदाने राहिली. तुम्ही साऱ्या साऱ्यांनी मला खूप मनापासून प्रेम दिले. इतर नोटांच्या तुलनेत मला नेहमी जास्त महत्त्व दिले.
मी तुमची दोन हजाराची नोट आज तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे मनापासून आभार मानत आहे. मित्रांनो,आयुष्यात हे असे लहान मोठे बदल होतच असतात तेव्हा त्यांना घाबरून जाऊ नका. मनातील नकारात्मकता काढून टाका. नवीन गोष्टींचे दोन्ही हस्ते स्वागत करायला शिका. मी तुमची दोन हजाराची नोट पुढे जाऊन कदाचित तुमच्या बरोबर नसेल परंतु मी सांगितलेल्या या दोन सकारात्मक गोष्टी नेहमी तुमच्याबरोबर राहतील.
या नंतर ही पुढे जाऊन माझ्याचप्रमाणे कदाचित अनेक विविध प्रकारच्या नवनवीन नोटा चलनात येतील. त्यांचेही खुल्या मनाने सहर्ष स्वागत करा परंतु तुमच्या या दोन हजाराच्या नोटेला मात्र कधी विसरू नका बरे का!
चला तर मग आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. मी हळूहळू चलनातून निघून जात चालली आहे. माझा ऱ्हास होत चालला आहे परंतु मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे की, जेवढे दिवस मी चलनात होती मी तुमच्या सर्वांसाठी एक आत्मविश्वास होती.
माझा काळ कदाचित एवढाच होता. पण कोणास ठाऊक कदाचित आपण पुन्हा भेटू एका नव्या रूपात व एका नव्या ओळखीत किंवा कदाचित कधीच नाही. हे सारं वेळच ठरवेल तेव्हा आता तुमच्या या दोन हजाराच्या नोटेला भरघोस प्रेम दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.