माझा आवडता सण " दिवाळी "- Maza Aawadta San - Diwali
" दिवाळी " म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. दिवाळी म्हणजे एकमेकांना भेटण्याचा सण. दिवाळी म्हणजे वर्षाचा सर्वात मोठा सण. याच दिवाळी सणाबद्दल आज आपण काही माहिती जाणून घेऊया. चला तर मग.
माझा आवडता सण " दिवाळी"
दिवाळी हा वर्षाचा सर्वात मोठा सण आहे. लोक या सणाला सर्वत्र मोठया उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. दिवाळीमध्ये लोक आपल्या घराला वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक तोरण आणि फुले लावून सुंदर सजवतात. नवीन कपडे आणि घरासाठी नवीन वस्तू या वेळी घेतले जाते. लहान मुलांसाठी तर दिवाळी म्हणजे सुट्ट्या, मज्जा आणि धमाल करण्याची आणि आनंदची जणू पर्वणीच असते. त्याच प्रमाणे भरपूर खाण्याची मेजवानीही असते. स्त्रिया दिवाळीला आपल्या दारासमोर सुंदर सुंदर रांगोळी घालतात आणि स्वादिष्ट असा फराळ बनवितात.
दिवाळी ही २१ दिवसांची मानली जाते परंतु त्यातील काही महत्वाचे दिवस असतात ते आपण समजून घेऊ.
• वसुबारस : वसुबारस या दिवसाचे महत्व सांगायचे झाले तर हा दिवस आपल्याकडे आपल्या घरचे गुरे वासरे जनावरे यांच्यासाठी महत्वाचा असतो. कारण आपल्या भारतात शेतीला खूप महत्व आहे आणि वसुबारस या दिवशी आपल्या घरच्या गाईची तिच्या वासरासह पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. या दिवसापासून स्त्रिया घरासमोर रांगोळी काढायला सुरुवात करतात. या दिवशी गाईला आणि तिच्या वासराला चांगले सजवून तिला हळद कुंकू लावून तिच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. तिची मनोभावे पूजा केली जाते आणि तिला केळीच्या पानामध्ये पुरणपोळीचे नैवेद्य दिले जाते.
• धनत्रयोदशी : धनत्रयोदशी या दिवसाला " धनतेरस " असेही म्हणतात. या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. या दिवशी काही ठिकाणी धने आणि गूळाचा नैवेद्य दाखवायचीही पद्धत आहे. तर काही ठिकाणी कडुलिंबाची पाने आणि साखर प्रसाद म्हणून देण्याची पद्धत आहे. कारण दररोज कडुलिंबाच्या पाने खाल्ल्यामुळे आजारपण होत नाही म्हणून हा प्रसाद देतात. धनत्रयोदशी या दिवशी बहुतेक लोक चांदीची भांडी खरेदी करणे शुभ मानतात.
• नरकचतुर्थी : नरकचतुर्थी या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता आणि त्यांच्या या पराक्रमाची आठवण म्हणून नरकचतुर्थी साजरी करतात. या दिवशी सकाळी लवकर म्हणजेच सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करतात. संपूर्ण शरीराला सुंगधी तेल आणि उटणे लावून मग अंधोळ करण्याला अभ्यंगस्नान म्हंटले जाते. अभ्यंगस्नान झाल्यानंतर घरातील सर्वांनी एकत्र मिळून फराळ खाण्याची पद्धत आहे.
• लक्ष्मीपूजन : लक्ष्मीपूजन हा दिवस दिवाळीच्या सर्व दिवसांमध्ये सर्वात महत्वाचा आणि मोठा दिवस समजला जातो. या दिवशी संध्याकाळी लोक नवीन कपडे घालून आपापल्या घरी लक्ष्मीची, घरातील दागदागिन्याची व पैशांची पूजा करतात. त्याचप्रमाणे कुबेराची ही पूजा केली जाते. आपल्या घरी अशीच वर्षोनुवर्षे धनधान्य आणि सुख संपदा नांदू दे व लक्ष्मीची कृपा राहू दे अशी देवाकडे प्रार्थना करतात. यां दिवशी घरात नवीन केरसुणी आणण्याची ही पद्धत आहे व या केरसुणीला हळदी कुंकू वाहून तिची पूजा केली जाते.
• दिवाळीपाडवा : दिवाळीपाडव्याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात. या दिवसापासून ' विक्रम संवत ' सुरु होतो. वर्षातील साडेतीन मुहूतापैकी एक म्हणून हा दिवस ओळखला जातो. व्यापारी लोकांसाठी आर्थिक हिशोबासाठी दिवाळी पाडवा हा नवीन वर्ष म्हणून सुरुवात करतात. दिवाळी पाडव्याला संद्याकाळी विवाहित स्त्रिया पतीला ओवाळतात आणि पती आपल्या पत्नीला ओवाळणी म्हणून काही तरी भेट देतो.
• भाऊबीज : भाऊबीज हा सण आपल्या संस्कृतीत खूप आनंदाने साजरा होतो. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे जातो आणि बहीण त्याला ओवाळते आणि त्याच्यांसाठी गोडधोड जेवण करते. त्या नंतर भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतिक म्हणजे भाऊबीज हा दिवस आपण साजरा करतो.
अशाप्रकारे दिवाळी हा सण आपण सगळे खूप आनंदाने साजरा करतो.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. धन्यवाद.
0 टिप्पण्या