Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याचे आत्मवृत्त - Shetkaryache Aatmvrutta- मराठी निबंध -आत्मवृत्त

शेतकऱ्याचे आत्मवृत्त | Shetkaryache Aatmvrutta | Autobiography Of A Farmer Essay In Marathi | 



               
शेतकऱ्याचे आत्मवृत्त - Shetkaryache Aatmvrutta
शेतकऱ्याचे आत्मवृत्त


मित्रमैत्रिणींनो, भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. परंतु ही शेती करणारा जो शेतकरी आहे त्याची अवस्था आज खूप बिकट होत चालली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी आज खूप हालाखीचे जीवन जगत आहे. आज आपण यापैकीच एका शेतकऱ्याचे आत्मवृत्त  जाणून घेणार आहोत.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव सखाराम आहे. माझे वय ५५ वर्ष आहे आणि मी शेती करतो. म्हणजेच मी एक शेतकरी आहे. होय, मी एक शेतकरी आहे. माझे वडील व आजोबाही शेतकरीच होते. आमचा पिढ्यानपिढ्या शेतीचा व्यवसाय आहे. माझ्या कुटुंबात मी, माझी पत्नी, माझी दोन मुले आणि माझी आई आहेत.

माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी माझ्याच खांद्यावर आहे. शेतीचा व्यवसाय करूनच मी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करतो आणि माझ्या मुलांचे शिक्षण करतो. शेतीची कामे ही मुख्यतः पावसावर अवलंबून असतात. पाऊस वेळेत आला तर कामे चालू होतात परंतु पाऊस कमी झाला किंवा प्रमाणापेक्षा जास्त झाला तर हाच पाऊस आम्हाला शेतीसाठी घातक ठरतो. 

लावणी केल्यानंतर जर अवेळी पाऊस आला तर माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे खूप नुकसान होते. म्हणजेच प्रत्येकवेळी ओला दुष्काळ किंवा सुखा दुष्काळ दोन्ही ही माझ्यासाठी घातकच आहेत. त्यामुळे या मधील कोणताच दुष्काळ संकट बनून येऊ नये हीच भीती असते.

मी शेतीची सुरुवात बी पेरणी पासून करतो. बी पेरणी पासून ते लावणी कापणी असे अनेक कामे शेतीमध्ये असतात. हे काम खूप कष्टाचे असते पण आम्ही ते खूप आनंदाने करतो. माझ्या या कामामध्ये माझे कुटूंबीयही जसे जमेल तशी माझी मदत करतात याचा मला खूप अभिमान आहे. या कामामध्ये दिवसरात्र खूप मेहनत घ्यावी लागते पण उलट त्याचा जो परतावा मिळतो तो माझ्या उदरनिर्वाह्यासाठी खूप तुटपुंजा ठरतो.

माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण मला चांगले पुर्ण करायचे आहे परंतु कुठे तरी माझे उत्पन्न त्यासाठी कमी पडताना सतत मला जाणवत राहते. आणि ह्याची मला खंत आहे. माझ्या घरी माझी वयस्कर आई आहे. मला तिची खूप काळजी वाटते कारण प्रसंगी जर तिची तब्येत बिघडली तर तिला चांगल्या मोठया हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी माझ्याकडे तितके पुरेसे पैसे नसतात.

आमचे राहणीमान साधे आहे परंतु एखादया सणा-सुदीला पत्नी, आई आणि मुलांना छान कपडे मी घेऊ शकत नाही. माझ्यावर वेळप्रसंगी गरजेसाठी घेतलेले थोडे कर्ज आहे पण ते फेडण्यातच माझी सगळी कमाई संपून जाते. आणि स्वतः शेती करूनही माझ्या घरी दोन वेळच्या जेवणाचे हाल होतात.

कधी कधी माझ्या मनात जीवन संपण्याचे नको ते विचार ही येतात पण मी हार मानत नाही. पुनः रोज सकाळी नव्या उमीदीने मी कामाला लागतो. कारण माझ्यामध्ये कष्ट करण्याची तयारी आहे. आणि माझ्या कुटुंबाची मला साथ आहे. त्यातच मी आनंदी आहे.

मला माझ्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे भविष्य चांगले घडवायचे आहे. पण त्याच बरोबरीने मला आधुनिक पद्धतीने शेतीमध्ये अजून काही नवनवीन प्रयोग करता येतील का जेणेकरून आपल्या उत्पनाचे अजून जास्त मार्ग खुले होतील हे ही शोधायचे आहे आणि ते शिकायचे ही आहे.

मला विश्वास आहे की, आज जे शेतकऱ्याचे दिवस आहेत ते उद्या नक्कीच बदलतील. शेतीच्या व्यवसायाला उद्या नक्कीच एक चांगले उत्पन्न म्हणून ओळखलं जाईल. त्यासाठी माझी आणि माझ्यासारख्या माझ्या इतर अनेक शेतकरी मित्रांची कष्ट करण्याची तयारी आहे. आणि तुमच्यासारख्या माझ्या मित्रमैत्रिणींकडून मला फक्त एकच अपेक्षा आहे की जे अन्न तुम्ही ताटात टाकता ते शेतात उगवण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. तेव्हा ते वाया जाऊन देऊ नका. कारण महाराष्टातील आज कित्येक घरात दोन वेळच्या जेवणाचे ही हाल होत असतात.

आम्हा शेतकऱ्यांना फक्त तुमच्या साथीची गरज आहे आणि मला विश्वास आहे की एक ना एक दिवस आपल्याकडील शेतकऱ्याला आणि शेतीलाही सुगीचे दिवस येतील.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close