भाजी मार्केट | Bhaji Market | Vegetable Market Essay In Marathi.
मित्रमैत्रिणींनो, आपण कधी ना कधी तरी नक्कीच आपल्या आई बाबा किंवा आजी आजोबांबरोबर भाजी मार्केटमध्ये गेलेलो असतो. असाच मी एकदा भाजी मार्केट मध्ये गेल्याचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे.
माझ्या घरी आई -बाबा, आजी-आजोबा आणि मी असे पाच जण राहतो. आजी नेहमी देवळात जाते आणि येता येता भाजी मार्केट मधून निरनिराळ्या भाज्या घेऊन येते. भाजी मार्केट कसे असतें हे बघण्याचे मला नेहमी कुतूहल असायचे पण मला कधीच बघायला मिळाले नव्हते. परंतु मी ठरविले होते कीं एक ना एक दिवस मी नक्कीच आजीबरोबर भाजी घ्यायाला जाणार.
आज जेव्हा आजी निघाली त्यावेळी खूप वेळा आज मी पण येतो भाजी आणायला असे तिच्या मागे मी सतत भुणभुण लावली होती. शेवटी मी ऐकणारच नाही हे तिला उमजले आणि तिने मला स्वतः बरोबर भाजी मार्केट दाखवायला नेले.
मी खूप आनंदी होतो कारण आज मी भाजी मार्केट बघायला जाणार होतो. आजीने मला बजावले होते कीं तिकडे खूप गर्दी असते म्हणून मी तिचा हात सोडायचा नाही. मी तिची ही अट मान्य केली होती. मी आजीचा हात पकडून भाजी मार्केटच्या दिशेने निघालो.
जसे आम्ही भाजी मार्केटच्या जवळ जवळ जाऊ लागलो तस तसें भाजीवाल्या भैयांचे आवाज माझ्या कानावर येऊ लागले. 'टोमॅटो- टोमॅटो ', 'वाटाणा - वाटाणा,' अश्या अनेक भाजीवाल्यांचे आवाज कानावर येत होते. प्रत्येकजण स्वतः कडची भाजी कशी ताजी आणि स्वस्त आहे हे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना पटवून देत होते. आपल्याकडील भाजी एकदा घेऊन गेलात तर परत परत इथूनच भाजी न्याल हे ते भाजीवले सर्वाना सांगत होते.
आजी आणि मी ही सगळीकडे फिरत फिरत चांगली स्वस्त आणि ताजी भाजी कुठे मिळतेय का ते शोधत होतो. माझी आजी रोजच भाजी मार्केटमध्ये जाणे येणे करत असल्यामुळे एक भाजीवाल्या काकींकडे तिची ओळख झाली होती. आजी दररोज त्यांच्याकडूनच पालेभाजी घेत असे. त्या काकींकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या फक्त पालेभाज्याच मिळत असत. त्यात चवळी, मेथी, लाल माठ, पालक, कांदापात आणि कोथिंबीर अश्या अनेक प्रकारच्या पालेभाज्या होत्या.
पालेभाज्यांचे आपल्या रोजच्या जीवनात खूप महत्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. रोज आपल्या जेवणात पालेभाज्यांचा समावेश करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे शाळेत आपल्याला शिकवले जातेच. त्यामुळे आजी रोज निरनिराळ्या पालेभाज्या बाजारातून घेऊन येते.
आम्ही दोघे तिकडे फेरी मारत होतो आणि अजून कुठे चांगली भाजी मिळते का ते बघतच होतो तेवढ्यात एक मुलगा आमच्या समोर आला आणि तो आजीला लिंबू विकत घेण्याची विनंती करू लागला. तो माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनीच मोठा वाटत होता. स्वस्त लिंबू देत असल्यामुळे आजीने त्यांच्याकडून लिंबूही विकत घेतले. पुढे जाऊन आम्ही एका भाजीवल्या काकांकडे थांबलो. तिकडे आजीला चांगली वांगी दिसली. आम्ही तिथून वांगी आणि भेंडी आणि काकडी घेतली.
भाजी मार्केटमध्ये खूप गर्दी होती. सतत लोकांच्या ये -जा करण्यामुळे आणि भाज्यांच्या गाड्यांच्या आवक -जावकमुळे तिथे थोडा धुरळा ही उडत होता.
पुढे काही स्त्रिया भाजीवाल्याकडे पैसे कमी करावे म्हणून आरडा ओरड करत होत्या. त्यातील काही भाजीवाले कमी पैसे करून देत ही होते आणि काही भाजीवाले पैसे कमी करायला तयार नव्हते. मला हे सगळं खूपच नवीन होते. त्यामुळे मला सगळं बघून खूप कुतूहल ही वाटते होते आणि हसूही येत होते.आपली आजी रोज देवळातून येताना भाजी घेऊन येते मला फक्त एवढाच माहिती होते परंतु त्यामागे एवढे सगळ्या गोष्टी पार करून जावे लागते हे मात्र माहिती नव्हते.
अजूनही मी आजीचा हात घट्टच पकडून ठेवला होता. मला माझ्यासारखी आणखी ही काही लहान मुले त्यांच्या आई बरोबर तिकडे आलेली दिसत होती. भाजी मार्केट एवढे मोठे होते कीं मला आता चालून चालून खूप कंटाळा आला होता आणि मला घरी जायचे होते. पण भाजी मार्केट मधील हा माझा अनुभव माझ्यासाठी खूप विलक्षण होता.
मी आणि आजी घरी आलो पण माझ्या डोळ्यासमोर सतत ते एका रांगेने बसलेले भाजीवाले दिसत होते, आपापल्या भाज्या कशा इतर भाजीवाल्यांच्या भाज्यांपेक्षा ताज्या आणि स्वस्त आहेत ते सांगणारे भाजीवाले, सतत ओरडून ओरडून लोकांना आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारे ते भाजीवाले आणि तिच भाजी पैसे कमी करून द्यावे म्हणून त्यांच्याकडे भांडणाऱ्या स्त्रिया सगळे सगळे सतत घरी आल्यावर ही डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होते.
मी घरी आल्यावर आई बाबा आणि आजोबांना भाजी मार्केटमध्ये मी काय काय अनुभव घेतले ते सगळं खूप उत्साहाने सांगितले आणि ते तिघेही मला खूप कुतूहलाने खूप प्रश्न विचारत होते. असा हा माझा भाजी मार्केट मधील विलक्षण अनुभव मी कधीच विसरणार नाही.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटलं नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.