मी एक कोरोनाग्रस्त बोलतोय | कोरोनाग्रस्ताची आत्मकथा | Mi Ek Coronagrasta Boltoy | Coronagrastachi Aatmkatha | Autobiography Of Corona Patient | आत्मवृत्त |
![]() |
मी एक कोरोनाग्रस्त बोलतोय - कोरोनाग्रस्ताची आत्मकथा |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका कोरोनाग्रस्त व्यक्तीचे आत्मवृत्त किंवा कोरोनाग्रस्त व्यक्तीचे मनोगत बघणार आहोत.
नमस्कार मित्रांनो, मी एक कोरोनाग्रस्त व्यक्ती बोलतोय. आज मी तुम्हाला माझ्या या कोरोना आजाराच्या प्रवासाबद्दल काही सांगू इच्छितो जेणेकरून ज्या चुका माझ्या हातून झाल्या आहेत त्या तुमच्याकडून होऊ नयेत.
माझे नाव आकाश आहे. मला कोरोना हा आजार झाला आहे. मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती असून मी एका हॉस्पिटलमध्ये सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. जेव्हापासून कोरोना या आजाराबद्दल आपल्याला माहित होत गेले आहे तेव्हापासून आमच्या हॉस्पिटलमध्ये सतत याचे रुग्ण येत असत.
आमचे कार्य हे रुग्ण सेवेचे असल्यामुळे परंतु हा आजार संसर्गजन्य आहे याचीही तितकीच पूर्ण कल्पना असल्यामुळे आम्ही सर्व कामावरील लोक हे स्वतः ची काळजी घेऊनच तेथील रुग्णांचीही काळजी घेत असू.
कोरोना हा आजार तसा सर्वांसाठीच नवीन आणि त्याबद्दल पुरेशी अशी माहिती कोणालाच नसल्यामुळे आम्ही मात्र जसं जसं जमेल तसें डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपापली जबाबदारी दररोज पार पाडत असतो.
असेच दररोज प्रमाणे गेल्या आठवड्यात ही मी सकाळी लवकर कामावर गेलो. नियमित प्रमाणे मी दिवसभर काम केले आणि संद्याकाळी मी घरी आलो. परंतु त्या दिवशी घरी आल्यापासूनच मला माझ्या शरीरात थोडा थकवा जाणवू लागला. मी विचार केला की दिवसभर रुग्णांच्या मदतीसाठी धावपळ करणे वाढले असल्यामुळे मला कदाचित कामाचा त्रास झाला असेल म्हणून माझे शरीर थकले असेल. त्यामुळे त्या दिवशी माझे जेवण लवकर आटोपून मी रात्री लवकर झोपी गेलो.
सकाळी मात्र मला पहाटे पहाटेच जाग आली. कारण माझे अंग खूपच तापले होते. मला खूप ताप आला होता. मला काहीच कळत नव्हते की मी काय करू? मी माझ्या पत्नीला सर्व काही सांगितले आणि माझा जो थकवा होता तो आणखीनच वाढला होता. त्यामुळे मला थोडी भीती ही वाटू लागली.
काहींच वेळात मी स्वतः वेगळ्या खोलीत जाऊन आराम करू लागलो व पत्नी व मुलांना तेथे येण्यास मनाई केली. माझे काम हे रुग्णांच्या आसपास असल्यामुळे माझ्या मनात संशय येऊ लागला होता की कदाचित ही लक्षणें कोविड 19 ची म्हणजेच कोरोनाची असू शकतात म्हणून दिवस उजाडल्यावर मी तात्काळ जाऊन माझी कोविडची चाचणी करून घेण्याचे ठरविले.
ठरल्याप्रमाणे मी जाऊन माझी कोविड चाचणी केली त्याचा रिपोर्ट येण्यासाठी एक दिवस अजून अवकाश होता. म्हणून मी माझ्या कुटुंबियांपासून वेगळाच राहिलो होतो जेणेकरून जर मला या कोरोनाची लागण झाली असेल तर माझ्यामुळे माझी पत्नी आणि मुले यांना ती होऊ नये.
दुसरा दिवस उजाडेपर्यंत मला काहीच सुचत नव्हते. माझ्या मनाची घालमेल सुरु झाली होती. आपल्याला खरंच कोरोना झाला असेल का? तो कशामुळे आणि कधी झाला असेल? आपल्यामुळे आपल्या घरातील एखादया व्यक्तीला तर आपण हा आजार संसर्गद्वारे दिला नसेल ना?
हॉस्पिटल मध्ये इतर रुग्णांची मदत करताना आपण शक्य ती सर्व काळजी घेत होतो त्याचबरोबर आपण वेळोवेळी आपले हात ही स्वच्छ धुवत होतो तरी पण असे कसे काय होऊ शकेल हे असे आणि या सारखे असंख्य विचार माझ्या डोक्यात फिरत होते. याच विचारांमुळे तो संपूर्ण दिवस मला काही खावेसे ही वाटते नव्हते. झोपही लागत नव्हती. थोडासा खोकला ही सुरु झाला होता.
शेवटी दुसरा दिवस उजाडला. माझा रिपोर्ट आला होता आणि मला कळविण्यात आले की मला कोरोना झाला आहे. हो! मला कोरोना झाला! मी एक कोरोना रुग्ण झालो आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या पायाखालील जमीन हादरली होती. काय करु, कोणाला सांगू मला काहीच समजत नव्हते. मला हॉस्पिटल मध्ये जाऊन दाखल होण्यास सांगितले गेले होते.
काही वेळातच एक ऍम्ब्युलन्स आली आणि त्यात बसून मला घेऊन गेले. परंतु हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी जाताना मला फक्त डोळ्यासमोर माझी पत्नी आणि दोन मुले हेच दिसत होते. सुदैवाने माझे आई वडील हे गावी होते नाही तर माझ्यामुळे त्यांना मी लागण झाली असती तर हा विचार ही मी करू शकत नव्हतो.
जागतिक संकट असलेल्या कोरोना नावाच्या या आजाराने जर का माझा बळी घेतला तर माझ्या कुटूंबाचे काय होईल या काळजीने माझा जीव कासाविस झाला होता. माझ्या कुटूंबातील इतर कोणालाही कोणत्याही प्रकारची लक्षण नसल्यामुळे व त्यांचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले होते म्हणून मग मी थोडा निश्चिन्त झालो होतो.
मार्च 2020 मध्ये कोरोना या जागतिक महामारीची ओळख आपल्या सर्वाना झाला परंतु हा जीवघेणा आजार आज माझ्या घराच्या आत कसा काय आला याचे उत्तर काही केल्या मला मिळत नव्हते.
घरात आलेल्या सर्व वस्तू, भाज्या, फळे आम्ही न चुकता स्वच्छ धुवून ठेवायचो. साफसफाई आणि निर्जतुकीकरण ही केले जात असे. पण मग हे असे का? कुठे चुकले? कसे चुकले? आणि कधी चुकले तेच कळले नाही.
शेवटी मी हॉस्पटलमध्ये दाखल झालो. कोरोना रुग्णांच्या वार्डमध्ये आल्यावर मला माझ्यासारखे इतर अनेक कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असताना दिसलें. प्रत्येकाची शारीरिक स्थिती जेवढी अशक्त झाली होती त्यापेक्षाही तेथील प्रत्येकाची मनःस्थिती जास्त वाईट झाली होती. या आजारामुळे आलेलं नैराश्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. परंतु हॉस्पिटल मधील कोरोना योद्धे व कर्मचारी यांनी आम्हा सर्वाना खूप धीर दिला आहे. वेळोवेळी आमची विचारपूस केली जाते. आमचे जेवण खाण व औषधांबरोबरच वेळोवेळी आम्हाला गरम पाणी आणि वाफही घ्यायला सांगितले जाते.
आज मला येथे येऊन आठ दिवस पूर्ण झाले आहेत. आता माझी तब्येत थोडी थोडी सुधारत ही आहे. येथील रुग्ण एकमेकांकडे बोलून एकमेकांना धीर देत असतात. काही दिवसांनी मला घरी सोडतील असे डॉक्टर बोलले परंतु या आजारामुळे माझ्या डोळ्यादेखत खुपसे लोक अचानक आपल्यातून निघून गेलेले मी पाहिलेले आहे. त्यामुळे मला नाही माहिती यातून मी संपूर्ण बरा कधी होऊ शकेन. परंतु मला माझ्या घरी जाण्याची ओढ लागली आहे. माझी पत्नी आणि मुले आणि माझे आई वडील यांची मला खूप आठवण येते.
मला कोरोना झाला आहे परंतु त्यामुळे मला खूप गोष्टी कळल्या आहेत. कोरोना या आजाराने मला आपल्या माणसांची किंमत करायला शिकवले आहे. कोरोना या आजाराने मला निरोगी आरोग्याचे महत्व ओळखला शिकविले आहे. कोरोना या आजाराने मला स्वछतेचे महत्व शिकविले आहे. कोरोना आजाराने मला हे शिकवले आहे की आयुष्यात पैसा, संपत्ती, राग, द्वेष, भांडणे, तिरस्कार, मत्सर, भेदभाव या गोष्टीना काहीही किंमत नाही. एक अचानक आलेला आजार एका क्षणात सारे काही संपवू शकतो पण यातील कोणतीही गोष्ट आपल्याला त्यापासून वाचवू शकत नाही.
तेव्हा मित्रांनो, माझ्याकडून मी तुम्हाला फक्त एकच विनंती करेन की कोरोना या आजाराला जर आपल्याला स्वतः पासून दूर ठेवायचे असेल तर बाहेरील कोणत्याही वस्तूला हात लावल्यास वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवत राहा किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा आणि स्वतः ची काळजी घ्या जेणेकरून तुमच्यामुळे तुम्ही हा आजार तुमच्या कुटुंबियांना देणार नाही.
त्याच बरोबर आपल्या कुटुंबियांना आपण हवे आहोत हे नेहमी लक्षात ठेवा व सर्वात महत्वाचे म्हणजेच चेहऱ्यावर मास्क लावायला कधीच विसरू नका आणि सर्वात महत्वाचे आणि गरजेचे म्हणजेच आता कोरोनासाठी ठिकठिकाणी वॉक्सिन ही द्यायला सुरु केलेले आहे ते ही आवर्जून घ्या.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.