आई संपावर गेली तर-Aai Sampavar Geli Tar.
मित्रमैत्रिणींनो, आपल्या कुटुंबातील सर्वाना एकत्र बांधून ठेवणारी एक व्यक्ती म्हणजेच आपली आई असते. आज आपण आपली आई जर संपावर गेली तर..... आपल्या आयुष्यात काय बदल होतील ते समजून घेऊया.
रोज सकाळी आपल्याला सकाळच्या साखर झोपेतून उठवणारी व्यक्ती आपली आईच असते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आई शिवाय जमतच नाही कारण आईशी निगडीतच प्रत्येकाची कामे असतात. पण जर एखादया दिवशी आई संपावर गेली तर..... विचार करूनच मला भीती वाटली.
आई जर संपावर गेली तर आणि जर मला सकाळी झोपेतून लवकर जाग आलीच नाही तर मग मला कोण बरे उठविणार? जर मी लवकर उठलोच नाही तर मला शाळेत जायला उशीर होईल किंवा मी झोपूनच राहीन आणि त्या दिवशी शाळेची सुट्टी होईल. त्यानंतर मी दुपारी उशिरा उठल्यामुळे मला लगेच भूकही लागेल परंतु आई संपावर असल्यामुळे मला नाश्ताही मिळणार नाही. बाबा किंवा ताई मला ब्रेड बटर खायला देतीलही कदाचित पण पोहे, डोसा, उपमा असे स्वादिष्ट पदार्थ मला मिळणार नाही. दुपारी जेवणाचे ही तेच हाल होतील. माझी खेळणी, कपडे सगळीकडे पसरलेले दिसतील. ते मलाच सगळे उचलावे लागतील.
आई संपावर गेली तर माझा शाळेचा गृहपाठ कोण घेईल? संध्याकाळच्या वेळी आई नेहमी माझ्या बाजूला बसून माझी शिकवणी घेते, मला गणितासाठी पाठे आणि चांगले चांगले श्लोक शिकवते ते कोण शिकवेल? आई संपावर गेली तर परीक्षेच्या वेळी माझी तयारी कोण करून घेईल, मला अभ्यासातील अडचणी कोण समजावून सांगेल आणि माझी परीक्षेची तयारी नीट न झाल्यामुळे मला कमी मार्क मिळतील.
आई संपावर गेली तर मला खेळायला गार्डन मध्ये कोण नेणार? मी जर खूप खूप वेळ टीव्ही समोर बसून राहिलो तरी मला कोणीही ओरडणारे नसणार आणि माझ्या जास्त वेळ टीव्ही बघण्यामुळे परिणामी माझ्या डोळ्यांना त्रास होईल.
जर आई संपावर गेली तर माझा वाढदिवस कोण हौशेने साजरा करेल? कारण दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आई मला ओवाळते आणि माझ्या आवडीचे गोडधोड पदार्थ बनविते, त्या दिवशी माझ्या मित्रमैत्रिणीसाठी खास मेजवानीचा बेत आखते असे हे सगळे आई नेहमीच आनंदाने करीत आलेली आहे.
आईच्या संपावर गेली आणि जर मी आजारी पडलो तर कोण माझी मायेने काळजी घेईल? कारण नेहमी माझ्या आणि ताईच्या आजारपणात आई रात्र रात्र जागुन वेळोवेळी आम्हाला औषधपाणी देते. आमची खूप काळजी घेते. वेळोवेळी ऋतू बदलत जातात तसें ती निरनिराळे घरगुती काढे तयार करून आम्हाला पिण्यास देते जेणेकरून आम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होऊ नये.
आई संपावर गेली तर माझी आणि ताईची भांडणे कोण सोडविणार? बाबा जर मला कधी रागे भरले तर आईशिवाय मला पाठीशी कोण लपविणार? आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच आई जर संपवार गेली तर रात्री मला कुशीत घेऊन छान छान गोष्टी कोण सांगणार? मला तर हा विचार करूनच भीती वाटतेय.
परंतु आई जर संपावर गेली तर फक्त माझीच पंचाईत न होता बाबांची आणि ताईची पण खूप पंचाईत होईल. ज्याप्रमाणे माझी सकाळ आईने उठवण्यावरून होते तशीच ताईची सकाळ पण आईने हाक मारूनच होते. ताईची तर सकाळची शिकवणीला जाण्याची घाई असते. ताई जर झोपून राहिली तर तिची शिकवणी तर बुडेलच पण त्यापाठोपाठ तिची शाळाही बुडेल. ताईला हाताने नीट केस बांधता येत नाहीत त्यामुळे जर आई संपावर गेली तर ताईचे केस ती स्वतःच वाकडे तिकडे बांधून शाळेत जाईल आणि त्यामुळे तिला बाकीच्या मुली कदाचित हसतीलही.
आई संपावर गेली तर मला आणि ताईला शाळेत डब्बा मिळणार नाही. घरातील एखादे फळ आम्हाला डब्ब्यात न्यावे लागेल. त्याने आम्हा दोघांचे पोट पूर्ण भरणार नाही. शाळेतून आल्यावर ताई रोज नृत्यच्या शिकवणीला जाते तिकडे जाण्यासाठी आईच तिला तयार करते आणि सोडायला जाते. आईच्या संपामुळे तिच्या नृत्य शिकवणीचे ही नुकसान होईल. ज्याप्रमाणे ताईच्या खूप गोष्टींवर आईच्या संपामुळे परिणाम होईल तसेच आईच्या या संपाचा परिणाम बाबांच्या ही खूपश्या कामांवर होईल.
आई संपावर गेल्यामुळे बाबांना सकाळीच सकाळी गरम गरम चहा आणि चविष्ट नाश्ता कोण देईल? बाबांची ऑफीसची तयारी नीट होणार तर नाहीच परंतु त्यांनाही ऑफिसचा डब्बा आईच्या या संपामुळे मिळणार नाही. ना ईलाजाने त्यांना ऑफिसच्या कॅन्टींगमधेच खावे लागेल. बाबांना ऑफिसमध्ये जाताना घाई तर होईलच परंतु त्यांना वेळेत त्यांचा हातरूमाल, मोजे आणि घड्याळ मिळणार नाही.
आई संपावर गेल्यामुळे घरातील आर्थिक घडीही विस्कळीत होईल. दूधवाला, पेपरवाला, भाजीवाला,किराणावाला, विजेचे बील आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच ताईच्या आणि माझ्या शाळेची फी अशी अनेक कामे आणि त्यांचे हिशोब गेल्या कित्येक वर्षांपासून आईच बघत आली आहे. त्या सर्वांमध्येही खूप गोंधळ होऊन जाईल.
आई आमच्या घराचा सर्वात महत्वाचा दुवा आहे जी नेहमी आम्हा सर्वांना सांभाळून ठेवते आणि एकमेकांपासून जोडून ठेवते. आज कित्येक वर्षे आई आमच्या साठी खूप काही करीत आलेली आहे परंतु आम्ही नेहमी तिला गृहीत धरूनच चाललो होतो.
आज जेव्हा आई संपावर गेली तर...... हा विचार मनात आला आणि पुढे इतके सगळे परिणाम होती हे लक्षात आले आणि तेव्हा खरंच मला माझ्या आईची माझ्या आयुष्यातील खरी मौलाची जागा समजली आणि त्यामुळे आज आपण प्रत्येकाने मानात हे पक्के ठरवूया कीं यापुढे आपणही आपल्या आईला जेवढी जमेल तेवढी तिच्या कामात मदत करून तिच्यावरच्या कामाचा अतिरिक्त भार कमी करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या आईविषयी नेहमी कृतज्ञता दाखवूया.
आमचा हा लेख कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.