माझी आई | Majhi Aai | My Mother Essay In Marathi.
माझी आई
![]() |
माझी आई |
कुटुंब म्हंटल की वेगवेगळी नाती ही आलीच. पण माझ्यासाठी सर्वात जवळच असं नातं म्हणजे माझी आई.
लहापणापासून आपल्याला जसजशी जगाची ओळख व्हायला सूरू होते तेव्हा सर्वात पहिला आपण ज्या व्यक्तीला आपलं म्हणून ओळखू लागतो ती व्यक्ती म्हणजे आपली आई असते.
आई मग ती कोणाची का असो ती नेहमीच खूप महत्वाची व्यक्ती असते. अशीच माझी आई ही माझ्यासाठी आहे. माझी आई ही वरकरणी दिसताना चारचौघींसारखीच एक सामान्य स्त्री दिसते परंतु ती माझ्यासाठी खूप विशिष्ट व्यक्तिमत्व असलेली स्त्री आहे.
माझ्या आईचे बालपण एका छोट्याशा खेड्यातले आहे. लहानपणापासून तिला शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे घरातील आणि शेतातील काम करता करता तिने तिचे शालेय शिक्षणही चांगले पुर्ण केले आहे. पहिलापासूनच आईला काटकसर आणि निटनिटकेपणाची खूप आवड आहे. त्यामुळे तिने ही सवय मलाही लहानपणापासूनच लावली आहे. 'आयुष्यात कोणत्याच कामाला कमी लेखू नये' आणि 'जगात अशक्य असे काहींच नाही ' अशी शिकवण ती नेहमी मला देते.
उन्हाळ्याच्या सुट्टीत अथवा दिवाळीच्या सुट्टीत ती मला वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहित करते. एखादया नवीन कलेमध्ये मला ती कला शिकण्यास अडचण येत असेल तर ती माझा आत्मविश्वास वाढवते. मला तिचा हा गुण खूप आवडतो.
मी जेव्हा शाळेतून घरी येतो तेव्हा शाळेतल्या गमती जमती आईला सांगतो आणि तिलाही त्या ऐकायला खूप आवडते. वेळोवेळी ती माझ्या शिक्षकांच्या संपर्कात असते जेणेकरून मला शाळेत काही अडचण येऊ नये.
माझी आई सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संपूर्ण दिवस काही न काही करत असते आणि सतत कामात मग्न असते. दिवस उजाडल्यापासून तिच्या जबाबदाऱ्या चालू होतात. सकाळी बाबाच्या ऑफिसचा डबा आणि माझा शाळेचा डबा बनवण्यापासून तिची धावपळ सुरु होते. त्यानंतर आजीची चहा नाश्ता आणि औषधे ही आईच देते. मला शाळेत सोडायला येते. माझा अभ्यास असो किंवा मला रात्री गोष्टी सांगणे असो माझी आई सर्व गोष्टीत माझ्याबरोबर असते.
दिवसभर घरातील सर्व कामे करून पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक गोड स्मित हास्य असते. जे पाहून मन प्रसन्न होते. वेळोवेळी मला समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तीची माहिती करून देते. काय करावे काय करू नये हे ती मला नेहमी चांगल्या उदाहरणाने खूप चांगले समजावून सांगते.
सणासुदीला आमच्या घरी खूप पै पाहुणे येतात त्यांचे स्वागत ती नेहमी मनापासून करते. माझी आई जेवणही खूप उत्तम बनविते. आई एक उत्तम सुगरण आहे. मला तिच्या हातची पुरणपोळी आणि शेवयांची खीर खूपच आवडते. तिच्या अशा मनमिळाऊ स्वभावामुळे आणि छान छान निरनिराळ्या पाककृतिमुळे आमच्या घरी सतत पाहुण्यांची वर्दळ चालू असते. घरी येणाऱ्या प्रत्येकाला ती प्रेमाने खाऊ घालते.
आई रोज संध्याकाळी जेव्हा देवाची पूजा करते तेव्हा मला चांगले चांगले श्लोक शिकवते. आतापर्यंत मी आई कडून मनाचे श्लोक, पसायदान, आणि गणपती स्तोत्र चांगले शिकून घेतले आहेत. माझ्या आईला गाण्याची खूप आवड आहे आणि तिचा आवाजही खूप गोड आहे.
माझी आई खूप मायाळू आहे पण जर का मी कुठेही चुकीचे वर्तन केले तर प्रसंगी ती मला रागावते ही. आई फक्त आई नसून ती वेळोवेळी माझा गुरु ही बनते. माझ्या पुढील आयुष्यात वावरताना मला ज्या गोष्टींची गरज लागेल त्यासाठी उपयोगी पडतील असे चांगले संस्कारही ती देते.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.