शाळेचा पहिला दिवस-Shalecha Pahila Divas.
![]() |
शाळेचा पहिला दिवस |
मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वाना आपल्या शाळेचा पहिला दिवस धुरसटसा का होईना पण नक्कीच आठवत असेलच ना. आज मी आपल्या सर्वाना त्याच आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाबद्दल आठवण करून देणार आहे.
जेव्हापासून थोडेबहुत कळायला लागले होते तेव्हापासून फक्त माझा एवढाच दिनक्रम असायचा कीं सकाळी आपण उठलो कीं आई नाही तर आजी चांगला मस्त नाश्ता भरावयाच्या आणि अंघोळ घालून घरभर खेळणी देऊन मला खेळायला द्यायच्या.
पण एके दिवशी आई बाबा मला रोजचे घरचे कपडे न घालता पिवळ्या रंगाचा एक नवीन टी शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घालून छान तयार करून कुठे तरी फिरायला नेत आहेत असे जाणवले. आईच्या हातात एक दप्तर होते जे खूप सुंदर आणि नवीन होते. माझ्या गळ्यात त्यांनी माझा फोटो असलेले कसले तरी कार्ड घातले होते आणि त्यांच्या मागे हातरूमाल लावला होता. मला फक्त एवढेच कळले होते कीं मी आईबाबाबरोबर कुठे तरी फिरायला जात आहे म्हणून मी खूप खुश होतो. निघताना आजी सारखी माझ्या गालावरून मायेने हात फिरवत होती. मी तिला आनंदाने टाटा करून आईबाबांबरोबर फिरायला निघालो.
थोड्या अंतरावर गेलो असता आम्ही एका मोठया इमारतीच्या गेटच्या आत शिरलो. तिकडे माझ्यासारखे अजून खूप मुल मुली त्यांच्या आईबाबांबरोबर आलेल्या मला दिसल्या. माझी आई मला माझ्या दप्तरामध्ये माझी पाण्याची बाटली आणि खाऊ दाखवीत होती आणि नंतर खा असे सांगत होती. मला काहींच कळतं नव्हते कारण तिकडे खूप गोधळ होता. काही मुले रडत ही होती पण का? तेच मला कळत नव्हते.
पुढे एक बाई सर्वासमोर आल्या आणि एकेका मुलाचे नाव घेत त्यांना त्या गेटच्या आत नेत होत्या. असं का करीत असतील बरे ते मला कळत नव्हते पण मला थोडे थोडे लक्षात येत होते कीं फक्त लहान मुले त्यांचे दप्तर घेऊन आत जात होती पण त्यांचे आई बाबां मात्र गेटवरच उभे राहिले होते. त्यामुळे काही मुले जोरजोरात रडू लागली होती.
आता मात्र मी पण खुप घाबरलो होतो. आपण तर फिरायला आलोय ना मग आई बाबा बाहेर थांबून मुले आत का जात आहेत तेच मला कळत नव्हते आणि म्हणून मी आईचा हात घट्ट पकडून ठेवला आणि आपण इथून जाऊया असा हट्ट तिच्याकडे करत राहिलो पण क्षणार्धात काही घडण्यापूर्वीच माझे नाव घेण्यात आले आणि मी रडायला सुरुवात केली.. कारण मला हळू हळू समजले होते कीं आता मला ही या बाई घेऊन जाणार आणि आई बाबा बाहेरच राहणार. मी आईला घट्ट पकडून ठेवले आणि आई मला सतत समजावत होती कीं घाबरू नकोस आत खूप खेळणी आहेत. तुझे मित्र आहेत. तू खेळून ये मी इथेच आहे. पण मी जराही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतो.नीटसे सगळे आठवत नसले तरी पुसटसे आठवते कीं त्यावेळी मी खूप रडलो आणि मला आईने जबरदस्ती त्या बाईंकडे सोपावले.
पुढे आत गेल्यावर खूप मुले माझ्याऐवढीच होती त्यांना मी पहिले. आत मध्ये जाऊनही काही मुले रडतच होती, काही गप्प झाली होती तर काही एकमेकांकडे बघून परत रडायला सुरु करत होती. काही मुले तर मस्त खेळणी घेऊन खेळायला सुरु झाली होती. मी खूप बावरलेला होतो. माझ्या ओळखीचे फक्त माझे आई बाबा होते ते तर गेटच्या बाहेर उभे होते आणि इथे आत कोणीच माझ्या ओळखीचे नव्हते. मी गप्प झालो होतो पण आईचा चेहरा डोळ्यासमोर आला कीं मी पुन्हा रडायला सुरु करायचो. तिकडेच दोन बाई होत्या ज्या आम्हा सर्व मुलांना प्रेमाने समजावीत होत्या कीं तुम्ही शाळेत आला आहात. इकडे तुम्ही सर्वांनी खूप खेळायचे, मित्र बनवायचे, गाणी आणि नाच करायचे. पण आमच्यातील कोणीही ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
मी सारखा दरवाजाकडे नजर ठेऊन माझे आईबाबा मला इथून कधी नेतील याची वाट बघीत होतो पण थोड्या वेळाने जसं जसे बाकीची मुले खेळू लागली मी पण त्यांच्याबरोबर खेळू लागलो. छोट्या छोट्या तीन चाकी सायकली होत्या, भातुकलीची खेळणी होती, मोठे मोठे बॉल होते. हळू हळू आम्ही सगळे त्यात रमलो आणि मग थोड्या वेळाने बाईंनी आम्हाला आमच्या दप्तरातील डबा बाटली काढून दिली आणि खायला सांगितले. काहींनी खाल्ले तर काही जण फक्त पाणी पियाले. त्यानंतर आम्ही सर्वांनी एका छान बालगीतावर नाच केला आणि गाणी म्हंटली. पण हे सगळे सुरळीत चालू असतानाच मध्येच कोणी तरी मुल रडायला चालू करीत असे आणि त्याचे ते रडणे बघून इतरही रडायला सुरु करायचे. प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येत होती.
काही वेळाने आम्हाला आमचे दप्तर दिले आणि एकेकाला रांगेने बाहेर आणले. ज्या गेटवरून आम्हाला आत शाळेत नेले होते त्याच गेटवर आम्हा सर्वांचे आईबाबा अजूनही डोळ्यात प्राण आणून आमची वाट बघीत होते. जसे मी बाहेर आलो खूप पालकांच्या गर्दीत मी माझ्या आईबाबांना सारखा शोधू लागलो. मला माझी आई दिसली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. जसे आमच्या बाईंनी माझा हात माझ्या आईच्या हातात दिला तसा मी आईला आणि आईने मला घट्ट मिठी मारली. तो क्षण मी अजूनही विसरलो नाही.
रस्त्यातच मी आई बाबांना शाळेत काय काय झाले ते सांगू लागलो. आता माझी शाळेची भीती थोडी कमी झाली होती त्याच बरोबर एक दोन मित्रही झाले होते आणि आपण आतमध्ये जेव्हा शाळेत खेळत असतो तेव्हा आपली आई बाहेर आहे हा विश्वासही मला मनात पक्का झाला होता. घरी जाऊन मी आजीला जोरजोरात उड्या मारीत सांगत होतो कीं, ''मी शाळेत गेलेलो, मी शाळेत गेलेलो! आता मी रोज शाळेत जाणार, आता मी रोज शाळेत जाणार! मज्जा! " आणि आजी फक्त माझ्याकडे बघून मनापासून हसत होती.
असा हा माझा शाळेचा पहिला दिवस माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय आहे.
आमचा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.