माझा आवडता प्राणी बैल | Majha Aawadta Prani Bail.
![]() |
माझा आवडता प्राणी बैल |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण माझा आवडता प्राणी बैल या विषयवार निबंध बघणार आहोत.
दरवर्षी मे महिना आला आणि शाळेच्या सुट्ट्या सुरु झाल्या की मी गावी जातो. माझे गाव मला खूप आवडते आणि गावी गेल्यावर मी सर्वात जास्त ज्याच्या मध्ये जास्त गुंतून असतो तो म्हणजेच आमच्या शेतातील 'जिवा' नावाचा बैल. बैल हा माझा आवडता प्राणी आहे.
जिवा हा बैल माझ्या आजोबांकडे अगदी जन्माला आल्यापासूनच आहे. जीवाचे वडील म्हणजेच ढवळ्या बैल आजोबांनी एका बैल बाजारातून विकत आणलेले होते. ढवळ्या बैल आणि कपिला गाय ह्यांचा वासरू म्हणजेच आता मोठा झालेला जिवा बैल.
जिवा बैल अगदी वासरू असल्यापासूनच माझ्या आजोबांचा त्यांच्यावर खूप जीव आहे. आजोबांकडे एकूण ९ गाय बैल आहेत परंतु जिवा बैल त्यांचा विशेष लाडका आणि जिवाचे ही आजोबांवर तितकेचं प्रेम.
आमच्या गावचा बैल जिवा बाकीच्या बैलांच्या मानाने अंगाने तसा धष्टपुष्टच. मी आणि माझ्या काकांची दोन्ही मुले असे आम्ही सर्व मुले जेव्हा गावी जातो तेव्हा आम्हाला बघून तो सारखा हंबरतो. आम्हा सर्वाना ही तो खूप आवडतो. मी आणि माझा चुलत भाऊ दिनू आम्ही सतत त्यांच्या मागेपुढे खेळत असतो परंतु तो कधीही आम्हाला इजा पोचवीत नाही.
आमचा बैल जिवा ह्याचे पोळा या सणाला खूप लाड आणि कौतुक होते. पोळा हा सण म्हणजे काय माहिती आहे का? पोळा हा सण म्हणजेच बैलाचा मान सन्मान करण्याचा महत्वाचा दिवस. वर्षभर आपल्या शेतात आपल्या मालकाबरोबर दिवसरात्र राब-राब राबून कष्ट करणाऱ्या या बैलांना पोळा या सणाला शेतकरी दिवसभर आराम देतात. या दिवशी प्रत्येक शेतकरी खूप प्रेमाने आपापल्या बैलाला चांगली स्वच्छ आंघोळ घालून साफ करून त्याला सुंदर रंगबिरंगी रेशमी कपड्यांनी सजवून त्यांच्या कपाळावर त्याला शोभेसे मोठे तिळक लावून त्याची पूजा केली जाते आणि त्याला पुरणपोळी चे नैवेद्य दिले जाते.
जिवालाही पोळ्याच्या दिवशी असेच सुंदर सजवून त्याची पुजा आजी आजोबा करतात आणि त्याने वर्षनुवर्षे त्यांच्या साठी केलेल्या कष्टाची छोटीशी परतफेड म्हणून त्याला आराम देतात. जिवा ही या दिवशी खूप खुश असतो. त्याच्याबरोबरच्या इतर बैलाप्रमाणे तो ही सुंदर शाल अंगावर ओढून पुरणपोळी खातो त्यानंतर आजोबांबरोबर गावात मस्त एक फेरफटका मारून येतो आणि मग दिवसभर शांतपणे आराम करतो.
जिवा बैलाने माझ्या आजोबांना इतकी वर्षे खूप साथ दिली आहे. गावाकडील शेती जितकी पावसावर अवलंबून असते तेवढीच एका चांगल्या बैलाचीही शेतकऱ्याला साथ मिळाली की त्या शेतकऱ्याच्या मेहनतीला चांगले फळ मिळते.
जिवा जसे आजोबाना शेतीच्या कामात पुरेपूर मदत करतो त्याचप्रमाणे तो आजोबाना इतर कामातही तेवढीच मदत करतो जसे की बैलगाडी ओढणे , एखादे खेचकम करणे किंवा मोट ओढणे आणि त्याचबरोबर बैलगाडीतून मालवाहतूक करणे व लोकांचीही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ये जा करणे ही कामे ही आमचा बैल जिवा नेहमी करताना मी पाहिलेले आहे.
बैल ज्या गाडीला जोडून ती गाडी ये जा करण्यासाठी उपयोगात आणतात तिला बैलगाडी असे म्हणतात. मी जेव्हा गावी जातो तेव्हा मी आजोबांबरोबर आवर्जून या बैलगाडीमध्ये बसून गावात फेरफटका मारायला जातो. बैलगाडीमध्ये बसायला मला खूप आवडते.
एक शेतकरी नेहमी आपल्या गाय बैलांवर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करतो. त्यांना माया लावतो त्यांना वेळेवर खाणे पिणे देतो. आणि मग हेच गाय बैल आपल्या शेतकरी मालकाला शेतात कष्ट करून जितकी होईल तितकी साथ देतात.
जिवा नेहमीच आजोबांच्या मदतीला तयार असलेला मी पाहिलेला आहे. आजपर्यंत त्याला कधीच जबरदस्ती खेचत आणताना मी पाहिलेले नाही म्हणूनच तो इतर बैलापेक्षा जास्त विशेष आहे परंतु जर का कधी आमचा हा बैल जिवा थोडासा जरी आजारी पडला तर मात्र आम्ही सगळे कावरेबावरे होऊन जातो. तो जर आजारी पडला तर तो अन्न पाणी काहीही घेत नाही फक्त पडून राहतो. अशा वेळी मात्र आजोबा त्याला बर करण्यासाठी अगदी शर्थीचे प्रयत्न करतात आणि जो पर्यंत तो संपूर्ण बरा होत नाही तोपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत.
कधी कधी तर मला वाटते की खरंच बैल हा प्राणी जणू आपली माणसाची संपूर्ण भाषा पण समजतो. त्याला जेव्हा पण कोणी ए जिवा! अशी हाक मारली की तो त्याची मान सतत हलवीत राहतो. मला ते पाहुन खूप गंम्मत येते. जणू काय तो आपल्या हाकेला प्रतिसादच देतो.
एक प्राणी असून माणसाशी या बैलाचे हे नाते किती आपूलकीचे आणि ईमानदारीचे असू शकते हे आमचा बैल जिवा ह्याच्याकडे बघून मला जाणवते. बैल हा प्राणी नेहमी आपल्या मालकाबरोबर शेतात कष्ट करून राबत असतो आणि त्याबदल्यात तो आपल्या शेतकरी मालकाकडून फक्त एकच अपेक्षा ठेवतो ती म्हणजेच मायेची.
आमच्या गावच्या शेतातील जिवा हा बैल हे हया कष्टाचे आणि शेतकऱ्याविषयी त्यागाचे एक उदाहरणच असून असे अनेक बैल हे आपापल्या मालकांना त्यांच्या शेतीत मौलाची मदत करून आपले संपूर्ण आयुष्य राब-राब राबून अखेरच्या क्षणापर्यंत मेहनत करुन म्हातारपणी संपूर्णपणे थकून जातात त्यावेळी त्यांना फक्त गरज असते आपल्या शेतकरी मित्राच्या मायेची आणि त्याने केलेल्या कष्टाच्या जाणीवेची.
तेव्हा जेव्हा पण आपण आपल्या या कष्टकरी प्राण्याला भेट द्याल तेव्हा नक्की त्याच्या पाठीवरून मायेने एक हात फिरवायाला विसरू नका. कारण बैल हाच शेतकऱ्याचा खरा मित्र असतो हे विसरून आपल्याला चालणार नाही.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.