माझा आवडता सण गणेशोत्सव | Majha Aawadta San Ganeshotsav Marathi Nibandh | My Favorite Festival Ganeshotsav Esaay In Marathi |
![]() |
माझा आवडता सण गणेशोत्सव - Majha Aawadta San Ganeshotsav Marathi Nibandh |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण माझा आवडता सण गणेशोत्सव या विषयावर निबंध बघणार आहोत.
आपल्याकडे निरनिराळे सण साजरे करण्यात येतात त्यापैकी काही सण हे एक दिवसीय असतात तर काही सण चार पाच दिवस साजरे करण्यात येतात. यापैकीच एक मोठा सण जो मला खूप आवडतो तो म्हणजेच गणेशोत्सव हा सण आहे.
गणेशोत्सव हा सण म्हणजेच माझा खूप आवडीचा असा सण आहे. हा सण शहरातही मोठ्यां प्रमाणात साजरा करण्यात येतो व तेवढ्याच मोठ्यां प्रमाणात गावाकडील बाजूस हया सणाला खूप महत्व प्राप्त झालेले आहे. गावी विशेषत: कोकणात हा सण मोठ्यां धुमडक्यात साजरा करण्यात येतो.
गणपती बाप्पा हे माझ्या आवडीचे आराध्य दैवत आहेत. माझे गाव कोकणात असल्यामुळे माझ्या गावी ही एकत्र कुटूंब पद्धतीने आमच्या कुटुंबात गणपती हा सण खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो. माझे गाव ही कोकणातीलच असल्यामुळे गणेशोत्वासाठी आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या गावी जाऊन आजीआजोबांबरोबर हा सण साजरा करतो. माझ्या शाळेला गणपतीची पाच दिवस सुट्टी देण्यात येते म्हणून आम्ही गणेशचतुर्थीच्या आधीच एक दोन दिवस गावी पोहचतो.
गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवसाला हरितालिका असे म्हणतात. या दिवशी सर्व मुली व स्त्रिया हरितालिका मातेचा उपवास करतात व तिला मनोभावे पुजून तिची आरती गातात. या दिवशी मुली आणि स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात व फुगड्या घालतात.
हरितालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणेशचतुर्थी हा दिवस येतो. गणेशचतुर्थी म्हणजेच या दिवशी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते. आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती मोठ्यां सन्मानाने आपल्या घरी घेऊन येतो. हा दिवस खूप महत्वाचा असतो. या दिवशी माझी आई गणपती बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी २१ मोदकांचे ताट सजविते. गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. तसेच मला ही मोदक खायला खूप आवडतात.
माझे बाबा आणि आजोबा गणपती बाप्पाच्या गळ्यात घालण्यासाठी सुंदर अशी हिरव्यागार दुर्वांच्या जुडीची माळ बनवितात आणि त्याचबरोबर जास्वंदीचे फुल ही बाप्पाच्या हाताला लावतात. जास्वंदीचे लाल रंगाचे फुल आणि दुर्वा हया माझ्या लाडक्या गणपती बाप्पाला फारच प्रिय आहेत. या दिवसापासूनच सतत पाच दिवस दररोज सकाळ संद्याकाळ गणपती बाप्पासमोर आम्ही सर्व जण निरनिराळ्या आरत्या व श्लोक बोलतो. आरतीच्या वेळी घरातील वातावरण फारच प्रसन्न झालेले असते. आम्ही घरातील सर्व कुटूंबीय व शेजारी मिळून गणपतीची आरती खूप जल्लोषात आणि उत्साहात करतो.
गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसाला ऋषीपंचमी असे म्हणतात. या दिवशी सर्व स्त्रिया ऋषींची मनोभावे पूजा करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. ऋषीपंचमी या दिवशी "ऋषीची भाजी " अशी एक विशिष्ट प्रकारची चविष्ट अशी भाजी बनविण्यात येते व ती खाण्याची पद्धत आहे ज्यात निरनिराळ्या भाज्या एकत्र करून ही भाजी बनविण्यात येते ज्या भाज्यांमध्ये बैलाच्या मेहनतीची एकही भाजी नसते. म्हणजेच या भाजीमध्ये अळूची पाने, वाल, वाटणे, कोवळा माठ, भेंडी, लाल भोपळा या भाज्यांचा त्यात समावेश केला असतो.
गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाला गौरी आवाहन असे म्हणतात. गौरी आवाहन या दिवशी गणपती बाप्पा बरोबर गौरीची ही स्थापना केली जाते. याच दिवशी आमच्या घरी गणपती बाप्पा समोर श्री सत्यनारायणाची पूजा ही आयोजित केलेली असते.
गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवसाला गौरी पूजन असे म्हणतात. या दिवशी माहेरवाशिण म्हणून आलेल्या या आपल्या गौराईची घरातील स्त्रिया मनोभावे पूजा करतात. तिला गोडधोडाचे नैवेद्य दाखवितात. त्याचप्रमाणे या गौरीला पूजण्यासाठी सूपामध्ये वाण बनविण्यात येते त्याने या आपल्या गौरीला सर्व स्त्रिया ओवसतात. यालाच कोकणात "ओवसा" किंवा "ओवसे" असेही म्हणतात. नवीन लग्न झालेल्या नवऱ्यांनी पाच सुपे घेऊन गौरीला ओवसण्याची प्रथा आहे.
गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसाला गौरीगणपती विसर्जन असे म्हणतात. गणपतीच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी विसर्जनापर्यंत हे पाच दिवस कसे पटकन निघून जातात हे अजिबात कळत ही नाही.
गणपती विसर्जनाला मला खूप वाईट वाटते. अक्षरशः मला खूप रडू कोसळते. इतके दिवस आपल्या घरी विराजमान झालेला आपला लाडका बाप्पा आता आपल्याला निरोप देऊन त्याच्या गावी निघण्याची वेळ जवळ आलेली असते.
गणपती विसर्जनाच्या वेळी प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द येत असतो तो म्हणजेच " गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. " या घोषणेनेच आणि जड अंतकरणाने आम्ही सर्व कुटुंबीय आपल्या लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्याला निरोप देतो आणि पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी त्याची पुन्हा वाट पाहत राहतो.
असा हा माझा आवडता सण गणेशोत्सव जो प्रत्येक वर्षी माझ्यामध्ये नवीन उत्साह आणि चैतन्य निर्माण करून जातो व म्हणूनच हा सण मला खूप खूप आवडतो.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.