मी फळा बोलतोय | Mi Fala Boltoy-I Am Blackboard Talking Essay In Marathi.
नेहमीप्रमाणे शाळेच्या मधल्या सुट्टीत मी वर्गातील फळ्यावर चित्रे काढीत होतो मधेच मला कोणी तरी बोलत असल्याचा आवाज आला. मी इकडे तिकडे पहिले तर फळा बोलू लागला.
कसा आहेस मित्रा? मी फळा बोलतोय! आज मी तुला माझ्याबद्दल काही सांगणार आहे. आणि फळा बोलू लागला. मी तुझ्या वर्गातील फळा आहे. ज्यावेळी ही शाळा नवीन बनली होती त्यावेळी मला इथे आणले गेले. गेली कित्येक वर्षे मी या वर्गात असाच भिंतीला चिटकून उभा आहे. तुझ्या सारखे किती तरी विदयार्थी माझ्यासमोर लहानाचे मोठे झालेत.
मी ज्या वर्गात आहे हा इयत्ता तिसरीचा वर्ग आहे. वेगवेगळे शिक्षक प्रत्येक तासाला येतात आणि माझ्या पृष्ठभागावर लिहून तुम्हा विद्यार्थ्यांना अभ्यास शिकवतात.
मला जेव्हा आणले गेले तेव्हा माझे शरीर काळेभोर, चमकदार आणि गुळगुळीत होते. रोज सकाळी जेव्हा शाळा सुरु व्हायची त्यावेळी मला साफ ओल्या कपडाने किंवा सुख्या डस्टरने नीट पुसून स्वच्छ केले जायचे. मला स्वच्छ केल्यामुळे मी खूप खुश व्हायचो. आणि जेव्हा शाळेची घंटा वाजून शाळा सुरु होऊ लागायची तेव्हा एक एक मुल वर्गात येऊ लागायचे ते मी बघायचो. सगळी मुले मला माझे मित्रच वाटायची. काही मुले शिक्षक वर्गात येईपर्यंत खडू घेऊन माझ्यावर वेगवेगळी सुंदर सुंदर चित्रे काढत बसायची तर काही वात्रट मुले लांब बसून मला खडूचा नेम लावून मारायची.
खडू आणि डस्टर म्हणजेच माझे जवळचे मित्र. खडू, डस्टर आणि माझी खूप घट्ट मैत्री आहे.
मी फक्त फळा नसून तुम्हाला शिक्षणासाठी मदत करणारा एक महत्वाचा दुवाही आहे. मी स्वतःजवळ तुमची सगळी माहिती ठेवतो. जसे कीं रोज किती मुले उपस्थित आहेत आणि किती अनुपस्थित आहेत याची माहिती शिक्षक फळ्यावरच तर लिहितात. तुम्हा मुलांना रोज चांगले सुविचार वाचता यावेत म्हणूनही फळ्याचाच वापर होतो. शाळेत तास कोणताही असो मग तो चित्रकलेचा असो किंवा गणिताचा असो पण मी फळा तुम्हाला ते शिकण्यासाठी पूर्ण सहकार्य करतो.
शिक्षकांचा तर मी खूपच जवळचा. प्रत्येक विषयाच्या शिक्षकांना स्वतः जवळील ज्ञान जर तुम्हाला नीट समजून सांगायचे असेल तर माझा वापर करूनच ते तुम्हाला धडे, कविता, गणिते, विज्ञान, चित्रकला आणि अनेक अश्या गोष्टी शिकवितात.
ज्यावेळी शाळेत काही विशेष दिवस असतो त्या दिवशी तर तुमच्या बरोबर मी ही खूप खुश असतो. कारण त्या दिवशी जसं तुम्हाला अभ्यासाला सुट्टी असते तशीच मला ही सुट्टी असते आणि ज्या दिवशी तुमचा वार्षिक परीक्षेचा निकाल असतो त्या दिवशी तर मला शिक्षक खूप सजवतात. वेगवेगळ्या रंगांच्या खडूनी माझ्यावर कलात्मक नक्षिकाम करतात. वर्गात पहिल्या तीन क्रमांकावर आलेल्या मुलांची नावे मोठ्यां अक्षरांत लिहिले जातात. तुम्ही सगळे वर्गात आल्या आल्या फाळ्यावरच मोठ्या अक्षरात अभिनंदन असे लिहिलेले असते. वर्षभर मेहनत करून पुढच्या इयत्तेत गेल्यामुळे तुम्ही सगळे त्या दिवशी खूप खुश असता परंतु माझी तुमची गट्टी झालेली असते त्यामुळे तुम्ही मला सोडून वरच्या इयत्तेत जाणार म्हणून मला थोडे वाईट वाटते. पण हे तर माझ्याबरोबर वर्षानुवर्षे घडत आलेले आहे. पुढील वर्षी पुन्हा नवीन येणाऱ्या छोटया विद्यार्थी मित्रांना भेटण्यासाठी मी उत्सुक असतो.
आतापर्यंत अशीच अनेक वर्षे निघून गेली. तुमच्यातील खुपसे विद्यार्थी मित्र मोठे झाल्यावर खूप वर्षांनी शाळेला भेट द्यायला येतात तेव्हा आवर्जून मला म्हणजेच फळ्यालाही भेटतात. मायेने माझ्यावर हाथ फिरवतात. जुन्या आठवणीत हरवून जातात. सारे सारे बघतो मी. तुम्हा साऱ्यांना बघून खूप बरे वाटते मला.
पण आता मी जुना झालोय. नवीन असताना तो गुळगुळीतपणा आणि ती चकाकी मला होती ती कालांतराने निघून गेलेली आहे. जग बदलत चाललय तशी टेकनॉलॉजीही बदलत गेली. आता कितीतरी शाळांमधून माझ्यासारखे काळेभोर फळे नाहीसे झालेले आहेत. आमची जागा आता पांढऱ्या शुभ्र नवीन फळ्यांनी घेतली आहे.
कदाचित तुम्हा पुढील पिढीला काही वर्षांनी आम्ही जुने काळे फळे दिसनासे होऊ आणि परिस्थितीप्रमाणे आम्हाला आता तेवढे महत्वही राहिले नाही. पण माझी एक फळा म्हणून मनापासून फक्त एवढीच इच्छा आहे कीं शेवटी फळा कोणताही असो जुना किंवा नवा पण तुम्ही मुलांनी चांगले शिका आणि आपले आणि आपल्या शाळेचे नाव नक्की मोठे करा आणि मला म्हणजेच तुमच्या फळ्याला कधीच विसरू नका. त्यातच मला खरा आनंद आहे.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.