Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नापास झालेल्या विद्यार्थाचे आत्मवृत्त- Napas Zalelya Vidyarthyache Aatmvrutta -मराठी निबंध -आत्मवृत्त

नापास झालेल्या विद्यार्थाचे आत्मवृत्त- Napas Zalelya Vidyarthyache Aatmvrutta.  

    
नापास झालेल्या विद्यार्थाचे आत्मवृत्त- Napas Zalelya Vidyarthyache Aatmvrutta



मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका नापास झालेल्या विद्यार्थ्यांची आत्मकथा किंवा आत्मवृत्त बघणार आहोत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावीच्या बोर्डाचे निकाल चांगले लागले. आमच्या गावातील शाळेचा दहावीचा निकाल ही चांगला लागला परंतु काही विद्यार्थी यावर्षी नापास झालेली गोष्ट कानावर आली त्यातीलच एक नापास झालेला विद्यार्थी म्हणजेच आमच्या शेजारचा राजू दादा. राजू दादा अभ्यासात तसा ठीक ठीकच होता परंतु तो नापास होईल असे कधीच वाटले नव्हते. तो नापास झाल्याने सर्वांनाच एक धक्का बसला. म्हणजेच त्यालाही ते खरे वाटत नव्हते म्हणून आज आपण तो आपल्याला त्यांचे आत्मवृत्त सांगत आहे.

नमस्कार मित्रांनो, मी राजू बोलतोय! आज मी तुम्हाला स्वतः बद्दल काही सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यात काही गोष्टी उपयोगी ठरतील. ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला माझी म्हणजेच एका नापास झालेल्या मुलाची आत्मकथा सांगत आहे.

हो! बरोबर ऐकलत तुम्ही. मी या वर्षी दहावीला नापास झालेलो आहे. मी एक नापास झालेला मुलगा आहे. तुम्हाला वाटेल की मी हे तुम्हाला का सांगत आहे? बरोबर ना? मी तुम्हाला हे यासाठी सांगत आहे कारण आज जेव्हा मी नापास झालो त्यावेळी मला आता हे चांगलेच कळले आहे की नापास होणे हे भावना ही कीती वेदनादायी असू शकते ते!

आज माझ्याबरोबरचे माझे सगळे मित्र पास झालेत फक्त मी एकटाच नापास झालोय. आज ते सगळे जण पास होण्याचा आनंद घेत गावभर फिरत आहेत. एकमेकांबरोबर हा आनंद मोठ्या जल्लोषाने साजरा करीत आहेत पण मी आज इथे एकटा बसलो आहे. माझ्या या परीक्षेच्या वाईट निकालाच्या परिस्थितीला मी इतर कोणाला नाही तर स्वतःलाच जबाबदार मानतो. कारण मी दहावीच्या वर्षाला या अभ्यासाला तितकेसे जास्त गंभीरपणे घेतले नाही.

माझे आई बाबा खूप कष्ट करून माझी आणि माझ्या लहान भावाची शाळेची फी भरतात. माझे बाबा एका ठिकाणी माळीचे काम करतात व माझी आई लोकांच्या घरी स्वयंपाक बनवायचे काम करते. ही कामे करून त्याचबरोबर माझे आई बाबा शेतीचीही कामे करतात आणि त्यांच्या हया कष्टामुळे आमचे घर कसेबसे चालते. आज मी नापास झालो आहे त्यावेळी मला माझ्या आईबाबांकडे बघून खूप वाईट वाटते आहे कारण आज मी त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. त्यांनी जे दिवसरात्र मेहनत करुन माझ्या शिक्षणासाठी जो खर्च केला त्याचे मी चीज करू शकलो नाही याची मला खूप खंत वाटते आहे.

लहानपणापासूनच मला खेळाचे जास्त वेड होते. अभ्यास करून काय करायचे असे मला नेहमी वाटते असे. मी सतत गावच्या मैदानात खेळात रमलेला असायचो. प्रत्येक वर्षी थोडा बहुत अभ्यास करून एक एक इयत्ता कसा बसा मी हळू हळू पास होत पुढल्या इयत्तेत जात राहिलो. परंतु जेव्हा दहावी सारखे महत्वाचे वर्ष आले तेव्हा ही मी शाळेला, अभ्यासाला आणि शिक्षणाला तितकेसे गंभीरपणे घेतले नाही. 

घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्यामुळे अभ्यासासाठी खाजगी शिकवण्या लावणे आम्हाला परवडत नाही त्यामुळे माझ्या बरोबरीचे माझे मित्र रोज सकाळी उठून एकत्र गणिताचा सराव करीत तेव्हा ते मला ही बोलवीत पण मला सकाळी लवकर उठून गणिते करण्याचा कायम कंटाळा येत असे म्हणून मी त्यांच्याबरोबर अभ्यासाचा सराव करण्यात जात नसे. ती सगळी मुले दुपारी शाळेत नीट अभ्यासाकडे लक्ष देत आणि शिक्षकांनी शिकवलेल्या धड्यांमधील काही अडचणी समजत नसतील तर त्या नीट विचारून घेत असत पण मला तर त्यावेळी त्यांना बघून हसू येत असे की ही सगळी मुले परीक्षेचे टेन्शन का घेत आहेत? मला वाटे की आतापर्यंत जसे आपण थोडासा अभ्यास करून पास झालोय तसें यावर्षीही पास होऊन जाऊ.

मी अभ्यासात कधीच कमी नव्हतो. मला शिकवलेले सगळे समजत होते पण मी त्याचा जास्त मनापासून सराव करीत नव्हतो. माझे सगळे मित्र सतत मागील वर्षाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवित असत जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी त्यांचा पेपर वेळेत पूर्ण होऊ शकेल. पण मी तसें कधीच काही केले नाही.

मला विज्ञान विषय खूप आवडतो. गणितंही आवडते पण मी गणिताचा जास्त सराव कधीच केला नाही. इंग्रजी ची आवड हळू हळू होत चालली होती पण त्यातही मी जास्त खोलवर समजून घेण्यासाठी प्रयत्न केला नाही.

आमचे गावातील जीवन असल्याकारणाने वर्षभर येथे काही ना काही सण उत्सव साजरे होतच राहतात. या वेळी मी कधी शाळेत जात असे कधी जात ही नसे. सण उत्सव साजरे करण्याबरोबर बाकीची मुले अभ्यासाही सुरूच ठेवत होती पण मला ते जमलेच नाही. मग होळी असो, दिवाळी असो, मकरसंक्रांत असो, गुडीपाडवा असो किंवा गौरी गणपतीचा सण असो मी फक्त सण उत्सावामध्ये गुंतलेला असायचो.

दहावीचे हे अभ्यासाचे महत्वाचे वर्ष आपल्या पुढील आयुष्याची खूप महत्वाची पायरी ठरविणारे वर्ष आहे हे मी कधी लक्षातच घेतले नाही. या वर्षी कसून मेहनत करून पुढील वर्षी कॉलेजला गेल्यावर एखाद्या चांगल्या शाखेत ऍडमिशन मिळवून मी काही तरी चांगले शिकू शकलो असतो.

माझे आईबाबा हे अशिक्षित असूनही त्यांनी माझ्या शालेय शिक्षणासाठी मला कधीच कोणती कमी जाणवू दिली नाही आणि सतत ते कष्ट करीत राहिले. मी जर चांगला शिकलो असतो तर माझ्याकडे माझ्या घरची परिस्थिती सुधारण्याची एक संधी होती. पण आता त्या गोष्टी खूप मागे राहिल्या.

आज जसा दहावीचा निकाल लागला तसें आजूबाजूचे लोक आपापल्या मुलांना किती मार्क मिळाले हे सांगायला येत आहे त्याच बरोबरीने माझे मार्कही विचारीत आहेत. आज मला माझीच किव येत आहे की वर्षभर मी शिक्षणाला गंभीरपणे का घेतले नाही? आज बाकीच्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला सतत जाणवते की मी जर अजून थोडी मेहनत घेतली असती तर तो आनंद कदाचित माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरही मला दिसू शकला असता.

आज मला शिक्षणाचे खरे महत्व कळले आहे. माझ्या मनात या वेळी खूप नैराश्य आणि नको ते विचार सूरू झाले आहेत की मी आज संपूर्णपणे हरलेलो आहे. जर मी चांगले शिक्षण घेतले नाही तर मला ही आयुष्यभर माझ्या उदरनिर्वाहसाठी कुठे तरी छोटीमोठी कामे करत राहावी लागणार आहेत याची पुरेपूर जाणीव मला आता झाली आहे. माझ्याबरोबरीचे माझे मित्र मेहनत करून पास झाले आहेत एक ना एक दिवस ते चांगल्या ठिकाणी कामे करू लागतील आणि मी मात्र मागे राहिलो आहे याची जाणीव मला सतत त्रास देतेय. काय करू कळत नाही...

पण आता मी हार मानणार नाही. माझ्या मनात कोणतेही नकारात्मक विचार येऊ देणार नाही. सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन वागत राहीन. आज जरी मी नापास झालेलो आहे पण मी परत होणाऱ्या फेरपरीक्षेला चांगला अभ्यास करुन या आव्हानाला संपूर्ण तयारीनिशी सामोरे जाईन. सर्व विषयांवर खूप चांगली मेहनत घेईन. खेळ खेळीन पण नक्कीच त्याचा वेळ कमी करीन. आळस करणार नाही आणि जेव्हा पण सण उत्सव येतील तेव्हा ते साजरे करत आपल्या अभ्यासातील ही सतत सातत्य ठेवीन.

आता मला शिक्षणाची खरी किंमत कळली आहे. आयुष्यात शिक्षणाएवढे बहुमूल्य काहीच नाही हे मला चांगले कळले आहे. माणूस शिक्षणाने आपला आणि आपल्या कुटुंबाचा नक्कीच फायदा करू शकतो ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे.

मी आता ठरविले आहे की चांगले शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी कामाला लागावे आणि वर्षानुवर्षे कष्ट करीत असलेल्या आपल्या आईबाबांना हातभार लावला. त्याचबरोबरीने शिक्षणाला दुर्लक्षित करून मी जी चूक केली ती चूक कधीच माझ्या लहान भावाकडून होऊ नये यासाठी ही मी प्रयत्न करणार आहे.
नापास झालेल्या मुलाची व्यथा काय असते ते मी तुम्हाला कदाचित कधीच संपूर्णपणे समजावू शकणार नाही परंतु मी एक गोष्ट आवर्जून करायचे ठरविले आहे ते म्हणजेच गावातील इतर लहान मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन.

आज मी माझ्या शाळेतील सर्व पास झालेल्या मुलांना माझ्याकडून शुभेच्छा देऊ इच्छितो कारण त्यांना मिळालेलं हे यश म्हणजेच त्यांच्या कष्टाचे आणि मेहनतीचे फळ आहे हे मी सर्वोतपरी मान्य करतो आणि मला मिळालेल्या आजच्या या अपयशाने खचून न जाता मी पुन्हा नव्या उमेदीने माझी दहावीची परीक्षा देईन आणि त्यात यशस्वीरित्या पास होऊन दाखवीन. माझ्या आईबाबांची मान गर्वाने ताठ करण्यासाठी मी खूप मेहनत घेईन.

म्हणूनच शेवटी तुम्हा मुलांना ही माझे हेच सांगणे आहे की एक संधी हुकली म्हणून आता सगळे संपले असे समजून न जाता आयुष्यात आपण कधीही हार ना मानता त्यातून नेहमी एक सकारात्मक धडा घ्या आणि नव्या जोमाने पुन्हा मेहनत करा आणि मग बघा यश तुमचेच आहे. कारण एक गोष्ट कधीच विसरू नका की "ज्यावेळी तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळी तुमच्या यशाचे हिस्सेदार खूप असतील परंतु तुमच्या अपयशाचे जबाबदार फक्त तुम्ही आणि तुम्हीच असाल." 

तेव्हा वेळेतच शिक्षणाचे महत्व समजा आणि जबाबदारीने आणि मेहनतीने खूप अभ्यास करा आणि मला विश्वास आहे की माझी म्हणजेच एका नापास झालेल्या मुलाची ही आत्मकथा ऐकून तुम्ही त्या चुका कधीच करणार नाही ज्या मी केल्या आहेत.



आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close