माझा आवडता प्राणी कुत्रा | Majha Aawadta Prani Kutra|My Favorite Animal Dog.
![]() |
माझा आवडता प्राणी |
आपण सगळेच जण लहानपणापासून कोणत्या ना कोणत्या प्राण्याला घाबरतो तसेच कोणत्या ना कोणत्या प्राण्याचा लळा आपल्याला लागलेला असतो आणि अगदी मोठे होईपर्यंत आपल्याला तोच प्राणी खूप आवडता राहतो. आज मी माझ्या अशाच एका आवडत्या प्राण्याविषयी तुम्हाला सांगाणार आहे.
लहानपणापासूनच मला कुत्रा हा प्राणी खूप आवडायचा. एके दिवशी बाबा अचानक एक छोटंसं कुत्र्याच पिल्लू घरी घेऊन आले आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. बाबांना ते पिल्लू रस्त्याच्या एका कोपऱ्याला भेटला होता. कदाचित तो रस्ता चुकला असेल असे वाटले. त्याला बघताच असं वाटल की तो खूप घाबरलेला आहे. तो आमच्या घरी आला तेव्हा असं वाटल की आमच्या कुटूंबात एक सदस्यच आहे. त्याच नाव आम्ही "मोती" ठेवलं.
मोती पहिले काही दिवस आम्हा सर्वाना घाबरत होता. मला अजूनही आठवतय ज्या दिवशी बाबा त्याला घरी घेऊन आलेले त्या रात्री तो रात्रभर घाबरून आवाज करीत होता आणि मी आणि माझी ताई आम्ही त्याच्या अंगावर सारखे पांघरूण घालीत होतो. आम्हाला वाटते होते कीं कदाचित त्याला थंडी वाजत असेल परंतु तो घाबरलेला होता. कोणी त्याच्या जवळ गेले की तो लगेच सावध व्हायचा पण कालांतराने तो हळू हळू आमच्यामध्ये रूळू लागला.
आज मोती तीन वर्षाचा झाला आहे. आमच्या दोघांची खूप घट्ट मैत्री आहे. तो सतत माझ्या मागेपुढे फिरत असतो. मी शाळेतून केव्हा घरी येतो त्याची तो दिवसभर वाट बघत असतो. कधी कधी माझे मित्रही त्याच्याबरोबर खेळायला आमच्या घरी येतात. खूप कमी वेळात तो आमच्या सर्वांचा खूप लाडका झाला. त्याला खायला मासांहारी जेवण आवडते. मी त्याला रोज सकाळी बाहेर फिरवायला घेऊन जातो. जेव्हा आम्ही कधी आमच्या गावी जातो तेव्हा त्याला शेतात हिंडायला फिरायला खूप मज्जा येते.
मला गेल्या वर्षीचा एक प्रसंग आठवतो जेव्हा मला थोडे बरे नव्हते. आई बाबा खूप काळजीत होते. मी झोपलो होतो पण मोतीला जणू काय कळलं काय माहित तो सतत माझ्या पायाकडे बसून असायचा. त्याच्या त्या एवढ्याश्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी तो मला बघत असायचा पण काहीही न बोलता ही त्याचे डोळे जणू सारखे हेच सांगायचे की तू लवकर बरा हो!
त्याच्या मधील सर्वात चांगली गोष्ट जी मला आवडते ती म्हणजे तो आल्या गेलेल्या कोणावरही कधीच भुंकत नाही. जे लोक त्याला संशयास्पद वाटतात तो फक्त त्यांच्यावरच भुंकतो. त्यामुळे आमचे बाकीचे नातेवाईकही त्याचे लाड करतात. कारण तो त्यांना काही त्रास देत नाही. त्याला विशेषतः लहान मुलांबरोबर खेळायला खुप आवडते. मी जेव्हा त्याला संद्याकाळी बाहेर फिरवायला नेतो त्यावेळी खूप लहान मुले त्यांच्या भोवती गर्दी करतात, त्याला हाका मारतात आणि तो ही त्यांचे नाव ऐकून कान टवकारून त्या दिशेने बघतो आणि आनंदाने शेपूट हलवितो.
मोतीच्या सगळ्या सवयी खूप चांगल्या आहेत त्यामुळे तो माझ्या सोसायटीमध्ये सगळीकडे खूप प्रसिद्ध आहे. आजपर्यंत त्यांच्यामुळे कधीच कोणाला नुकसान झालेले नाही. मी आणि बाबा वेळोवेळी त्याला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेतो आणि त्यांची तपासणी करून आणतो.
मोतिने जसा सर्वाना लळा लावला आहे तसाच इतरांनी ही त्याला खूप प्रेम दिलेले आहे. त्यामुळे मला मोती माझ्या कुटुंबातील सदस्य असल्याचा नेहमी अभिमानच वाटतो. मी त्यांच्यासोबत आणि तो माझ्यासोबत असला कीं आम्ही खूप मस्ती-मज्जा करतो. त्यामुळे असा हा माझा आवडता प्राणी माझा मोती कुत्रा मला खूप आवडतो.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. धन्यवाद.
हे ही वाचा- माझा आवडता प्राणी बैल
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.