मी पेन्सिल बोलतेय | Mi Pencil Boltey | Autobiography of Pencil Essay In Marathi.
मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वानीच लहानपणी आपल्या शालेय जीवनाची सुरुवात हातात पेन्सिल पकडूनच केलेली आहे त्यामुळे ही पेन्सिल आपल्या सर्वनाचीच खूप जवळची आहे. आज आपण याच पेन्सिलचे आत्मवृत्त किंवा पेन्सिलची आत्मकथा किंवा पेन्सिलचे मनोगत बघणार आहोत.
नमस्कार, मित्रांनो! ओळखलत का मला? मी पेन्सिल बोलतेय... लहानपणापासून तुम्हा सर्वानाचा माझे खूप आकर्षण असते. जेव्हा पेन्सिल हातात नीट पकडताही येत नसते तेव्हापासूनच पेन्सिलची ओढ तुम्हा सर्व मुलांना असते.
मी पेन्सिल वेगवेगळ्या रंगामध्ये मिळते. गडद, सौम्य, फिक्कट अश्या वेगवेगळ्या छटांमध्ये मी उपलब्ध आहे. तुम्ही शाळेत जायला लागल्यापासून मी तुम्हा सर्व मुलांची चांगली मैत्रीणच होते. मी जशी वेगवेगळ्या रंगामध्ये मिळते तशीच वेगवेगळ्या पद्धतीमध्येही मिळते. पूर्वी आम्ही पेन्सिली फक्त साध्या पेन्सिल म्हणून एकाच प्रकारामध्ये मिळत असू पण जसं जसा काळ बदलत गेला आम्हा पेन्सिलींचे स्वरूपही बदलू लागले.
आजकल काही पेन्सिल्स हया खोडरबरसह मिळतात. काही पेन्सिलींना तर पेनाचे स्वरूप दिलेले असते त्याला पेनाची पेन्सिल म्हणतात. काही पेन्सिल्स विशेष असतात त्या फक्त चित्रकलेच्या शेडींग्ससाठी बनविल्या गेलेल्या असतात आणि आजकल लहान मुलांना अधिक आकर्षित करण्यासाठी पेन्सिलच्या डोक्यावर काही तरी छोटेसे खेळणे ही लावून त्या विकायला ठेवलेल्या असतात.
मी पेन्सिल गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतःला खूप नशीबवान समजते कारण सर्वच लहान मुलांना नेहमीच माझी विशेष आवड असते. शाळेत जेव्हा एखाद्या मुलाचा वाढदिवस असतो तेव्हा मुले आपल्या मित्रांना वाटण्यासाठी आवर्जून पेन्सिलचाच पर्याय निवडतात कारण आम्ही पेन्सिली लहान मुलांना खूप आकर्षित करीत असतो. एखाद्या लहान मुलाला त्याच्या चांगल्या वर्तणुकीबद्द्ल जर घरातील वरिष्ठ व्यक्तींकडून काही बक्षीस द्यायचे झाल्यास ते ही मुलांना मुख्यतः पेन्सिल देण्यातच पसंती देतात.
माझ्या जोडीचे माझें इतर सवंगडी म्हणजेच जसे खोडरबर असो, फूटपट्टी असो किंवा शार्पनर असो त्या सर्वामध्ये मला नेहमीच जास्त मान असे. पण कालांतराने दिवस बदलत गेले आणि काळ बदलला आणि माझ्या सारख्या पेन्सिलींचे महत्वही आता हळू हळू कमी होत चालले आहे. पूर्वीप्रमाणे पेन्सिलिंची अधिक आवड आता मुलांमध्ये तशी दिसतच नाही याउलट ती आवड आता हळू हळू कमी होतानाच जास्त दिसायला लागली आहे.
तुम्हाला काय वाटते की आम्हा पेन्सिलींना पूर्वी सारखा मान आता राहिला असेल? नाही ना. बरोबर ! कारण आमची जागा पेनांनी घेतली आहे. आजकल लहानलहान मुले पण सुरवातच पेन पकडण्यापासून करतात. पेनामुळे उठणाऱ्या गडद रंगाच्या अक्षरांमुळे लहान मुलांना पेनांचे जास्त आकर्षण वाटते आम्हा पेन्सिलने लिहिलेली अक्षरे त्यांना फिक्कट वाटू लागतात. त्यामुळे पेनाकडे ती जास्त आकर्षिली जातात.
पेन्सिल वापरणे हे लहान मुलांच्या हिताचे असते कारण लहानपणी तुम्हा सर्वांची अक्षर ओळख होताना, नवनवीन लिखाण शिकताना तुम्ही सतत काही ना काही चुका ही करती असता, चुकत चुकत तुम्ही नवनवीन अक्षरे लिहायला शिकता आणि त्यावेळी जर काही सारख्या चुका झाल्या तर त्या खोडरबरने तात्काळ खोडून तुम्ही मुले त्या चुका सुधारू शकता. कारण खोडरबरने खोडल्यावर मी लगेच पुसून जाते परंतु तुम्हा मुलांना माझी कटकट वाटते.
अभ्यास करताना थोडेसे लिहून झाले कीं तुम्हा मुलांना मी फिक्कट वाटू लागते आणि मग तुम्ही मला शार्पनरने सारखे शार्प म्हणजेच टोक काढीत राहता. सारखे सारखे शार्प करून तुम्ही मला छोटी करून टाकता आणि ज्या वेळी मी तुमच्या हातात मावेनाशी होते तेव्हा तुम्ही माझी पाठवणी थेट केरच्या टोपलीत करता. खूप वाईट वाटते रे मला तेव्हा!
पेन्सिल म्हणून जन्माला आलेली मी तुम्हाला तुमच्या शिक्षणाच्या पहिल्या पायरीवरील बाराखडी शिकायला मदत करणारी मी, तुम्हाला अंकगणिताची ओळख करून देणारी मी, तुमच्या मनातील वेगवेगळ्या कल्पना चित्रांच्याच्या रूपाने वहीवर रेखाटण्यासाठी तुम्हा मुलांना नेहमीच प्रोत्साहन देणारी मीच ती पेन्सिल, तुम्ही लिखाणाचा सराव करताना तुमच्या चुका दुरुस्थ करणारी मी, तुमच्या बरोबर शाळेच्या पहिल्या दिवसापासून तुमच्या दप्तरामध्ये तुम्हाला सदैव साथ देणारी मीच ती पेन्सिल, हो मीच ती पेन्सिल शेवटी केराच्या बादलीत जाऊन संपते.....
मला मान्य आहे कीं मी पेनाएवढी महत्वाची नसेनही कदाचित कारण मी लिहिलेले अक्षर हे लगेचच खोडून निघून जाते परंतु पेनाने लिहिलेले कायम तसेच राहते म्हणून माझ्यापेक्षा जास्त पेनाला महत्व आहे. म्हणूनच बँकेची काय कामे असो असो किंवा ऑफिस मध्ये काही काम असो ज्या वेळी महत्वाच्या कागदपत्रवर काही काम करायचे असेल तेव्हा लोक माझ्यापेक्षा जास्त पेनाला नेहमीच महत्व देतात ही माझी कायमची व्यथा राहील आणि त्याबद्दल माझी कोणाकडेही कसलीही तक्रारही नाही.
परंतु माझ्या छोट्या मित्रांनो माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा "आयुष्यात जोपर्यंत पेन्सिलने लिहीत असाल तोपर्यंत तुमच्या चुका मान्य केल्या जातील त्या खोडल्याही जातात परंतु ज्या दिवशी तुम्हाला पेन्सिल ऐवजी पेन हातात दिला जाईल त्यानंतर आयुष्यातील तुमच्या चुकांना ही तुम्ही खोडने खूप अवघड होते."
तेव्हा शिका, मोठे व्हा, चुका झाल्या तरी त्या दुरुस्त करून आयुष्यात खूप पुढे जात राहा परंतु तुमच्या हया बालपणीच्या पेन्सिल मैत्रिणीला कधीच विसरू नका.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.