मी शाळेतील शिपाई काका बोलतोय | Mi Shaletil Shipai Kaka Boltoy.
![]() |
मी शाळेतील शिपाई काका बोलतोय. |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण शाळेतील शिपायाची आत्मकथा किंवा शाळेतील शिपायचे मनोगत (School Peon) हा निबंध बघणार आहोत.
नमस्कार मित्रांनो, मला ओळखलत का? मी तुमच्या शाळेतील शिपाई बोलतोय! हो बरोबर ओळखलत. तुम्ही मला राजू काका या नावाने हाक मारता. आज मी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती सांगणार आहे म्हणजेच माझे मनोगत सांगणार आहे.
बालमंदिर विद्यालय या शाळेत कामाला राहिलेल्याला मला जवळजवळ १५ वर्षे पूर्ण होत आलेली आहेत. मी मूळचा कोकणातला. माझे गाव रत्नागिरी आहे. माझे शिक्षण इयत्ता दहावी पर्यंत गावीच झाले आणि मग मी नोकरीसाठी इथे शहरात आलो. या शाळेत जेव्हा मला नोकरी लागली त्या वेळी मी खूपच आनंदी झालो. कारण मुळातच मला शिक्षणाची खूप आवड होती परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला माझे पुढील शिक्षण पूर्ण करता आले नाही.
पण जेव्हा मला हया विद्येच्या मंदिरात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण मला असे वाटले की काम करता करता शाळेच्या आणि शिक्षणाच्या आणखी जवळ राहता येईल. शाळेत नोकरी असल्यामुळे चार चांगल्या गोष्टीही रोज कानावर पडत राहतील. आणि मुख्य म्हणजेच शाळेतील वातावरण नेहमी सकारात्मक असल्यामुळे तिथे काम करताना कोणालाही हुरूपच येतो.
मी रोज सकाळी ६.३० वाजता या शाळेत हजर होतो. तुमची शाळेची वेळ ही थोडी उशिराने असते परंतु मला मात्र तुम्ही शाळेत प्रवेश कार्यापूर्वीच काही कामे करून ठेवावी लागतात. जसे शाळेसाठी कामावर रुजू केलेले सफाई कर्मचारी वेळेवर येऊन सर्व वर्गांची साफसफाई व्यवस्थितपणे करीत आहेत की नाही ते पाहणे, शिक्षक रूममध्ये प्रत्येक शिक्षकांचे टेबल- खुर्च्या नीट स्वच्छ पुसले आहेत की नाही ते पाहणे, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या केबिन नीट साफ केल्या आहेत की नाही ते ही मला आवर्जून पाहावे लागते.
तुम्हा विद्यार्थ्यांच्या बाथरूममध्ये पाण्याची व्यवस्था नीट व्यवस्थित सुरु आहे की नाही हे पाहणे आणि जर का एखाद्या दिवशी काही अडचण असेल तर वेळीच त्याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या लक्षात ती बाब आणून देणे ही सर्व कामे मी लवकर येऊन करतो.
शाळेची वेळ सुरु होताच मला पहिली घंटा वाजवावी लागते जेणेकरून तुम्हा मुलांना हा इशारा असतो की शाळा भरली आहे. असे दिवसभर मी प्रत्येक तासाला एक घंटा वाजवितो तस तसें तुमचे वेगवेगळ्या विषयांचे तास सुरु होतात. त्यासाठी मला वेळोवेळी घड्याळावर लक्षात ठेवावे लागते.
शाळेत काही स्पर्धा आयोजित केली असेल तर त्याची नोटीस मी संपूर्ण शाळेतील प्रत्येक वर्गात घेऊन येतो, काही कार्यक्रम असेल तर त्याआधी तेथील सजावटीची संपूर्ण जबाबदारी शिक्षक माझ्यावर निर्धास्त होऊन सोडून देतात कारण इतक्या वर्षात मी कधीही आपल्या जबाबदारीत काही कमी ठेवलेली नाही. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
तुम्ही मुले मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटताना वर्गात व क्रिडांगणावर दंगा मस्ती करता त्यावेळी अजाणतेपणी तुमच्यातील एखाद्या मुलाला हाता पायाला मार लागते किंवा दुखापत होते त्यावेळी शाळेच्या मेडिकल किट मधून मीच तुम्हाला औषध लावतो आणि वेळ पडल्यास तुम्हाला तुमच्या घरी ही सोडतो.
कधी शिक्षक वर्गावर नसताना तुम्ही दंगा केल्यावर मी तुम्हाला रागे ही भरतो पण त्याचबरोबर जेव्हा कधी तुमच्या शाळेची सहल जाते तेव्हा तुमच्याबरोबर सहलीच्या बसमध्ये लहान मुलांत मूल होऊन मी गाण्याच्या भेंड्या ही खेळतो.
तुम्ही सर्व विद्यार्थी मला राजू काका म्हणून प्रसिद्ध केले आहे. सर्वाना माझा खूप लळा लागला आहे. मला ही तुम्ही सगळी मुले माझीच मुले वाटता. तुमच्यातील कित्येक विदयार्थी गेल्या १५ वर्षात माझ्यासमोर लहानाचे मोठे होऊन पुढील शिक्षणासाठी कॉलेजला गेले परंतु ते आवर्जून मला भेटायला या शाळेत येतात. माझ्याबरोबर बसून जुन्या आठवणींना उजाळा देतात. मी ही माझ्यातर्फे त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा देतो.
तुम्ही सर्व लहान मुलांनी चांगले शिकून समाजाचे एक सुशिक्षित नागरिक व्यावेत असे मला मनापासून वाटते. तेव्हा मुलांनो, खूप शिका, मोठे व्हा आणि तुमच्या या शाळेच्या शिपाई काकांना कधीच विसरू नका व कधी तरी वेळात वेळ काढून मला नक्की भेटायला या.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.