मी पाहिलेला अपघात | Mi Pahilela Apghat |The Accident I Saw Essay In Marathi |
![]() |
मी पाहिलेला अपघात |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध बघणार आहोत.
दरवर्षीप्रमाणे वार्षिक परीक्षा संपून मला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. उन्हाळा आला की मी आई आणि बाबा आम्ही तिघे या सुट्टीत गावी जातो. मला माझे गाव खूप आवडते. आजही सकाळी लवकर आम्ही गावी जायला निघालो. माझे गाव कोकणात आहे. तिकडे जाताना घाटाघाटातून आमची गाडी जाते. मला गावी जाताना घाट सुरु झाला की खूप मज्जा येते. माझे बाबा गाडी नागमोड्या वळणावर जसजसे चालवत असतात मी ही गाडीत बसून तश्या तश्या वळणावर स्वतः ला वळवीत खेळत असतो.
आजही आम्ही गावी निघालो असताना घाट कधी सुरु होतोय त्याची मी सारखी वाट बघीत होतो. अखेर घाट सुरु झाला. घाटात रस्त्याने जाताना प्रत्येक वळणावर जागोजागी मोठ मोठे सावध करणारे फलक लावले होते की जेणेकरून गाडी चालवणारी व्यक्ती सांभाळून गाडी चालवेल आणि स्वतः सहित समोरच्या गाडीतील लोकांनाही सुरक्षित ठेऊ शकेल. प्रत्येक वळणावर गाडीचा वेग हा कमी ठेवा याची विनंती केलेली होती. मी एक एक फलक वाचत वाचत जात होतो.
घाटातील रस्त्याला खूप वाहने सतत दोन्ही बाजूने ये जा करीत असतात आणि रस्ता नागमोडी वळणाचा असल्यामुळे समोरून जर एखादे वाहन जोरात आले तर परिणामी अपघातही होऊ शकतो. माझे बाबा गाडी चालविताना खूप सांभाळून आणि सावकाश गाडी चालवितात.
रस्त्याने जाताना आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या ये जा करताना दिसत होत्या. त्यात काही खासगी वाहने, तर काही सरकारी एसटी बसेस, आणि काही मोठे ट्रक ही होते. आमची गाडीही घाटात हळू हळू नागमोडी वळणे घेऊन जात होती आणि जवळपास घाट संपणारच होता तेवढ्यात जोरदार कसला तरी आवाज आला. इतका जोरात की कोणती तरी गाडी कुठे तरी जाऊन आधळली असे वाटले. खूप काचा फुटल्याचा आवाज झाला होता. काही लोकांचा ओरड्याचा ही आवाज आला होता.
झालेला आवाज इतका जोरदार होता की आई बाबा आणि मी प्रचंड घाबरलो. मला धडधड सुरु झाली. आईने मला घट्ट पकडून ठेवले होते. बाबांनी ही गाडीचा वेग थोडा मंद केला होता. पुढे झालेला आवाज नेमका कसला होता तेच कळत नव्हते. हळू हळू आमची गाडी पुढे जाऊ लागली आणि समोर जे दृश्य बघितले ते खूपच भयावह होते.
घाटाच्या कडेलाच एका खाजगी गाडी आणि एका समानाच्या टेम्पोची टक्कर झाली होती. खूप मोठा अपघात झाला होता. गाडीसामोर प्रचंड गर्दी जमा झाली होती. गाडीमध्ये असलेल्या दोन व्यक्तींना खूप लागले होते आणि गाडीच्या काचा संपूर्ण तुटून गेल्या होत्या. बाबा ही आमची गाडी बाजूला लावून त्या अपघात झालेल्या लोकांची मदत करण्यासाठी पुढे धावत गेले. त्यांची विचारपूस करू लागले. काही लोक मदतयंत्रणेला व ऍम्ब्युलन्सला फोन करू लागले तर काही लोक अपघातग्रस्त व्यक्तीला पाणी पाजत होते.
माझे बाबा आणि इतर काही व्यक्तींनी त्या अपघात झालेल्या व्यक्तीच्या घरचे फोन नंबर घेऊन त्यांनाही या अपघातबद्दल शांतपणे सविस्तर माहिती देऊन घटना स्थळावर बोलाविले. टेम्पोच्या ड्राइव्हरला ही लागले होते आणि त्याचा टेम्पो हा मोठया दगडावर जाऊन धडकला होता. त्याच्या कामाच्या ठिकाणी ही फोन करून त्याच्या हया अपघातबद्दल कळविण्यात आले होते.
मी पाहिलेला हा सर्वात मोठा अपघात होता. अपघातग्रस्त व्यक्ती वेदनेने कळवळत होते, रडत होते. शेजारून जाणाऱ्या एसटी आणि इतर वाहनातील लोक वाकून बघून जात होते. त्यातील काही लोक मदतीसाठी गाडी थांबवीत होते. परंतु अपघात घाटाच्या अशा ठिकाणी झाला होता की तेथे मदतीसाठी काही यंत्रणा ताबडतोब उपलब्ध होणे शक्य वाटत नव्हते. काही वेळाने तेथे जवळपसाच तैनात असलेले पोलीस ही आले.
काही लोकांनी ऍम्ब्युलन्सची वाट न बघता इजा झालेल्या तिन्ही लोकांना आपल्या आपल्या गाडीत ठेऊन हॉस्पिटलला नेण्याचे ठरविले कारण या अपघातामुळे हळू हळू गाड्यांची गर्दी जमा होऊ लागली होती आणि या गर्दीमधून घाटातून वाट काढीत येणे ऍम्ब्युलन्सला खूपच त्रासदायक होईल आणि त्यात वेळाही खूप वाया जाईल हा विचार सर्वांनी केला. त्यांना लगेच काही लोक त्यांच्या गाड्यांमध्ये बसवून घेऊन गेले.
झालेला अपघात खूप भयानक आणि मोठा होता. दोन्ही गाड्या मोठ्यां धडकेमुळे पुढील भागातून संपूर्ण वाकड्या तिकड्या झाल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु त्यातील दोघे जणांना या अपघातामुळे गंभीर इजा झाली होती.
एव्हाना चांगलाच काळोख पडू लागला होता आणि बाबा ही त्यांना मदत करुन पुन्हा गाडीत येऊन बसले होते. आम्हाला आता गावी पोचायला खूपच उशीर होणार होता परंतु माझ्या बाबांनी त्या अपघातग्रस्त लोकांची मदत केल्याबद्दल आज मला त्यांचा खूप अभिमान वाटत होता.
आता आम्ही हळू हळू पुढे गावाच्या दिशेने निघालो परंतु संपूर्ण रस्ता आई आणि बाबा त्या आम्ही पाहिलेल्या अपघाताबाद्दलच बोलत होते. झालेल्या मोठ्यां अपघातात चूक कोणाची होती किंवा नक्की काय घडले हे कोणी सांगू शकत नव्हते परंतु एक गोष्ट सर्वाना कळून चुकली होती की जे फलक घाटामध्ये लावले होते ते खरंच आपल्या सर्वांच्या फायद्यासाठीच असतात आणि गाडी चालवीत असताना ओव्हर टेक करण्याऐवजी आपल्या गाडीच्या गतीवर लक्ष केंद्रित केले तर आपले व आपल्याबरोबर आपण इतरांचे ही प्राण वाचवू शकतो.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.