Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल सेल्फी एक मनोरोग - Mobile Selfy Ek Manorog - Mobile Selfie Is A Psychiatrist Essay In Marathi.

मोबाईल सेल्फी एक मनोरोग | Mobile Selfy Ek Manorog | Mobile Selfie Is A Psychiatrist Essay In Marathi |




         
मोबाईल सेल्फी एक मनोरोग - Mobile Selfy Ek Manorog -  Mobile Selfie Is A Psychiatrist Essay In Marathi.
मोबाईल सेल्फी एक मनोरोग - Mobile Selfy Ek Manorog.



मित्रमैत्रिणींनो, आज आपण मोबाईल सेल्फी एक मनोरोग या विषयावर वैचारिक निबंध बघणार आहोत.

मोबाईल हा आजच्या आपल्या धावपळीच्या युगातील आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक म्हणून ओळखला जातो. आज गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकजण मोबाईल धारक आहे आणि मोबाईल ही वस्तू खरंच काळाची गरज आहे त्याची अनेक कारणे ही आहेत. हा मोबाईल शाप की वरदान हा ही एक वेगळाच गंभीर चर्चेचा विषय आहे परंतु आज आपल्यासमोर या मोबाईलच्या बाबतीत दुसरी एक महत्वाची परंतु दुर्लक्षित केली गेलेली समस्या आहे ती म्हणजेच हया मोबाईलमध्ये असलेला त्याचा कॅमेरा. हो! मोबाईल सेल्फी कॅमेरा.

आज प्रत्येकाला मोबाईल मध्ये सेल्फी कॅमेरा उत्तम प्रतीचा असलेलाच मोबाईल हवा असतो. आजच्या काळात मोबाईल सेल्फी हा एक प्रकारचा छंद म्हणून लोक जोपासत असल्याचे दिसण्यात येते. आजची पिढी आणि त्याचबरोबर काही थोड्याबहुत प्रमाणात अगदी जुनी पिढी ही सोशल मिडीयाच्या इतक्या आहारी गेलेली आपल्याला दिसण्यात येते की त्यावर सतत आपण सर्वांच्या नजरेत कसे दिसत राहू यासाठी हया आपल्या मोबाईल सेल्फीचा पुरेपूर वापर करण्यात येतो.

मोबाईल सेल्फी प्रत्येक ठिकाणी सर्रास प्रकारे वापरण्यात येते. तरुणाईत तर या सेल्फीचे वेड अगदी शिगेला पोहलेले आहे. प्रत्येकाला आज या मोबाईल सेल्फीच्या मनोरोगाने इतके जखडलेले आहे की, ज्याला त्याला आपण मिनिटामिनिटाला काय करतोय, कुठे जातो, आपण आनंदी आहोत की दुःखी आहोत, आपण कोणाबरोबर आहोत, कुठे आहोत व त्याचबरोबर आपण काय खातोय पितोय ते ही सेल्फी काढून पोस्ट करायची घाई झालेली असते परंतु या गोष्टी पाहून आपण याचा मनापासून विचार केला तर लक्षात येते की हे प्रत्येक गोष्टीचे सेल्फी काढणे खरंच आपल्या आयुष्यात इतके महत्वाचे आहेत का?

या सेल्फी काढण्याने आपण आपले सुख दुःख इतर लोकांना दाखविल्याने त्यामध्ये खरंच काही वाढ़ किंवा घट होईल का?

आपण कुठल्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन काय खातोय किंवा कुठे फिरायला जाऊन मज्जा करतोय हे इतरांना दाखवून आपल्याला त्यातून काय आनंद मिळणार आहे? आणि जरी आनंद मिळाला तरी तो फक्त क्षणिक आनंद असतो कारण पुन्हा पुढील क्षणाला कोणी दुसरी व्यक्ती काही तरी वेगळी मज्जा करीत असलेला त्याचा सेल्फी आपण पाहतो आणि पुन्हा आपल्या मनात चलबिचल सुरु होते ते आणखी नवीन काही तरी करून दाखविण्याची आणि नवीन सेल्फी काढण्याची आणि याच चढाओढीच्या खेळातूनच सुरु होते ते एकमेकांपेक्षा आपण स्वतः किती खूष आहोत हे दाखविण्याची जीवघेणी स्पर्धा.

होय! याच स्पर्धेने तर आपण एकमेकांतील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि विशेषतः नाती हळू हळू संपवू लागतो आणि मग प्रत्येकाच्या मनात सूरु होतो तो एक मनोरोग म्हणजेच सेल्फीचा मनोरोग!

सेल्फीच्या नादात मनुष्य मनोरोगी होत चालला आहे. आज बाबा कामासाठी टूरवर गेले तरी सेल्फी काढतात, तर काही आई या मुलांना पौष्टिक अन्न बनविण्यासाठी नव्हे तर आपली सगळी मेहनत पिझ्झा, चायनीज, नूडलस बनवून त्याबरोबर स्वतःचा सेल्फी काढून टाकण्यात गुंतलेल्या दिसतात जेणेकरून त्या इतरांना हे दाखवू लागतात की आपण रोज काय आणि कसे नवीन पदार्थ बनवितो किंवा इतरांपेक्षा आपण कसे चांगले नवीन पदार्थ बनविण्यात सराईत आहोत यासाठी केलेला सगळं अट्टाहास आणि आपली तरुणाई तर प्रत्येक गोष्टीतच सेल्फी, सेल्फी आणि फक्त सेल्फी!

तरुणाईच्या समोर खाण्यासाठी अन्न आले की त्या खाण्याचा चांगला आस्वाद घेण्याऐवजी काही मुले पहिला त्या पदार्थाचा स्वतः सोबत सेल्फी काढताना दिसतात. ही एक प्रकारची मनोरुग्णताच म्हणता येईल.

वर्षभर आपल्याकडे निरनिराळे सण आणि उत्सव साजरे होत असतात. त्या सणांमध्येही प्रत्येक जण त्या सणाचे पवित्र राखून त्याचा पुरपूर आनंद घेण्याची सुरुवातच मोबाईल सेल्फीपासून होते. गणेशोत्सवात तर लोक आवर्जून आपल्या गणपतीबाप्पा बरोबर ही सेल्फी घेतात.

काही लोक तर सहलीला किंवा दूर पिकनिकला गेल्यावर तेथील निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी उंच उंच डोंगर कड्यावर जाऊन सेल्फी काढायला बघतात किंवा नवीन गेलेल्या ठिकाणी एखादी नदी, तलाव किंवा समुद्रात खोलवर जाऊन सेल्फी काढण्याचे धाडस करताना दिसतात व त्या जागेची पूर्णतः माहिती नसल्यामुळे कित्येकदा या सेल्फीच्या मोहपायी अनेक लोकांनी आपले जीव गमावलेले आहेत. ही पण एक प्रकारची मनोरुग्णताच आहे.

सेल्फीचा मनोरोग आज इतका वाढला आहे की लोक आपल्या वृद्ध नातेवाईकांना भेटायला जरी गेले तरी त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालविण्याऐवजी, त्यांची विचारपूस करण्याऐवजी त्यांच्याबरोबर सेल्फी काढताना दिसतात.

मोबाईल सेल्फीचे वेड इतके झाले आहे की अगदी नवीन बाळ जन्माला आले की लगेच त्याच्याबरोबर त्याचे आई वडील आणि इतर नातलग हे सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात. खरंच हे अगदी विचार करण्यासारखे आहे. यां सर्वांची घाई करण्याची खरंच गरज आहे कां?

सेल्फी मनोरोग्यांसाठी सेल्फी काढण्यासाठी कोणत्या ही करणाची गरज वाटत नाही. असे लोक कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात.

आजच्या काळात सकाळी उजाड्याबरोबरच कोणी सूर्यकिरण चेहऱ्यावर आलेले सेल्फी काढतात तर कोणी तब्येत बरी नसेल तर, तर काही लोक तर नाटक, सिनेमा जिथे जातात तेथे कोठेही उभे राहून सेल्फी काढतात. सेल्फी हा मनोरोग ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसण्यात येतो त्या लोकांना इतर आजूबाजूचे लोक आपल्याला बघत आहेत ह्याच्याशी ही काही लेणेदेने नसल्याचे आपण बघतो. त्यांचे ध्येय फक्त एक आणि एकच असते ते म्हणजे इतरांपेक्षा आपण कसे जास्त सेल्फी आपल्या सोशल मीडियावर टाकू शकू. याला सेल्फी मनोरोगी म्हणू शकतो.

आजच्या पिढीतील कित्येक तरुण तरुणीना सिनेमातील कलाकारांबरोबर ही सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. त्या आपल्या आवडत्या हिरो किंवा हिरोईनबरोबर किंवा एखाद्या क्रिकेटरबरोबर सेल्फी काढण्यासाठी कित्येक लोक आपले कामधंदा सोडून त्यांची वाट बघत तासनतास बसून राहतात जेणेकरून त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढता येईल. पण हा सेल्फी मिळवून त्यांच्या आयुष्यात काही बदल घडणार नसते हे त्यांनाही माहिती असते तरीही त्यांची मनोवृत्तीच तशी झालेली असते.

पूर्वी जेव्हा मोबाईल सेल्फी हा प्रकार अस्तित्वातच नव्हता तेव्हा ही लोक आनंदीच होती ना? त्या वेळी लोक एकमेकांच्या सुखदुःखात धावत जात होती, त्या वेळी लोक एकमेकांना सतत आपण काय करतोय, काय खातो, कुठे जातो, आज मूड खराब आहे की चांगला हे सर्व सांगत नसत. त्या वेळी लोकांच्या मने शांत असत कारण कोणालाही ही चिंता नसे की इतरांनी तो सेल्फी पोस्ट केला आहे तर आता आपण नवीन कोणता सेल्फी पोस्ट करावा. पूर्वी मोबाईल सेल्फी हे वेड नव्हते परंतु लोकांचे आयुष्य सुखी व सुरळीतच सुरु होते.

स्मार्ट मोबाईल फोन खरंच खूप गरजेचे आहे आणि त्यात चांगला कॅमेरा असणेही काही गैर नाही कारण त्याचा तर आपण चांगला वापर केला तर खरंच खूप उत्तम गोष्टी आपण त्यात टिपू शकतो परंतु जर त्या कॅमेरा फोनचा उटसूट वापर केला गेला तर आयुष्यात आपण स्वतः चांगली प्रगती न करता सेल्फीच्या या जीवघेण्या शर्यतीच्या चढाओढीमध्ये स्वतःला खूप मानसिक त्रास करून घेऊ आणि सेल्फीच्या या मनोरोगात एक कायमचा मनोरुग्ण बनून राहू.

तेव्हा मित्रांनो, वेळेतच भानावर या आणि सोशल मीडियावर आपले फॉलव्हर्स वाढविण्याच्या नादात स्वतःला या मानसिक आजाराचा बळी पडू देऊ नका. मोबाईल सेल्फी ही एक गंभीर समस्या आहे आणि तिचाविचार आपण नक्किच गंभीरपणेच केला पाहिजे तेव्हाच आपली पुढील पिढी या मनोरोगापासून वाचू शकेल.



आमचा हे लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close