Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

माझी आवडती मैत्रीण- Majhi Aawadti Maitrin-मराठी निबंध-My Best Friend Essay In Marathi-वर्णनात्मक

 माझी आवडती मैत्रीण | Majhi Aawadti Maitrin| My Best Friend Essay In Marathi.



माझी आवडती मैत्रीण
माझी आवडती मैत्रीण.



मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांनाच खूप मित्रमैत्रिणी असतात त्यातील एक आपला अगदी जवळचा मित्र किंवा मैत्रीण असते. असेच माझी पण एक आवडती मैत्रीण आहे तिच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे.

मी जेव्हा तिसरी मध्ये शिकत होते तेव्हाची गोष्ट आहे. माझ्या बाबांची कामाची बदली पुण्यावरून मुंबईला झाली होती. त्यामुळे आम्हाला सर्वाना मुंबईला याव लागले. मला माझी शाळा आणि तिकडचे मित्रमैत्रिणी सोडून इथे यायचे नव्हते. कारण मला इथे नवीन शाळेत जायची खूप भीती वाटत होती. 

नवीन शाळा कशी असेल, तिकडे माझे मन रमेल कीं नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजेच तिकडचे विद्यार्थी माझ्याकडे मैत्री करतील कीं नाही असे मला सतत विचार येत होते. आईने मला समजावले कीं हळू हळू तुझी ओळख होत गेली कीं सगळे तुझ्याकडे मैत्री करतील तरी पण मला खूप भीती वाटत होती.

शेवटी मुंबई मधील नवीन शाळेचा माझा पहिला दिवस उजाडला. आईने मला शाळेत सोडले. मी वर्गात जाऊन बसले. सगळी मुले इकडे तिकडे खेळत होती. पण मी मात्र खाली मान घालून गप्प बसून होते. एक एक जण वर्गात येऊन बसू लागले. मी एकटी बसून कोण कोण काय काय करीत आहे ते बघत होते. थोड्या वेळाने वर्गशिक्षिका आल्या आणि त्यांनी माझी ओळख सर्व विद्यार्थांकडे करून दिली आणि नंतर वर्ग सुरु झाला. एक एक करून तासिका होत गेल्या आणि मधल्या सुट्टी ची वेळ झाली.

सगळ्या मुली आपापल्या मैत्रिणीबरोबर डब्बा खाऊ लागल्या पण माझ्या शेजारी मात्र कोणीच नव्हते. मी खूपच हिरमुसून गेले होते आणि घाबरले ही होते. शेवटी मी एकटीच डब्बा काढून खाऊ लागले पण खाता खाता चुकून माझा डब्बा खाली सांडला आणि सगळे अन्न वाया गेले. मला खूप रडू कोसळले होते. तेवढ्यात माझ्या समोर स्वतःचा डब्बा पुढे करून एक मुलगी उभी राहिली. ती म्हणाली कीं आपण दोघी हा डब्बा खाऊया आणि तिने मला तिचे नाव सांगितले सुमन.

सुमन ही नावाप्रमाणेच नाजूक फुलासारखी होती. खूप प्रेमळ आणि मृदू आवाज होता तिचा. त्या दिवशी माझी आणि तिची मैत्री झाली आणि मग रोज आम्ही शाळा सुरु झाल्यावर एकमेकींबरोबर खूप गप्पा मारू लागलो, खेळू लागलो. आमची हळू हळू चांगलीच गट्टी जमली होती.

काही दिवसांनी मला शाळेत जाण्याची भीती कमी झाली होती आणि कधी एकदा शाळेत जाऊन माझ्या मैत्रिणी बरोबर खेळते असे मला होऊ लागले. आम्ही फक्त एकमेकींकडे खेळतच नाही तर एकत्र अभ्यासही करत असू.

शाळेचा क्रिडांमहोत्सव असो किंवा शाळेची सहल असो जिकडे तिकडे आम्ही दोघी एकत्र असायचो. जर माझ्या डब्ब्यात आई काही खास बेत करून एखादा पदार्थ द्यायची तर मी थोडा जास्त घेऊन जात असे ते सुमनसाठी आणि ती ही माझ्यासाठी छान छान पदार्थ आणायची.

सुमन अभ्यासाठी खूप हुशार होती. तिला नेहमी आंतरशालेय स्पर्धेत बक्षिसे मिळत. मला तिचे खूप कौतुक वाटते असे. आम्हाला एकमेकींबरोबर चित्रे काढायला आणि त्यांना रंगबिरंगी रंगानी रंगवायला खूप आवडायचे. बघता बघता इयत्ता तिसरीचे वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही आणि आम्ही चौथीला गेलो.

एक चांगली मैत्रीण मिळाली कीं प्रत्येक दिवस कसा फुलपाखरासारखा आनंदाने उडून जातो हे मला आता कळले आहे. मी आणि सुमन कधीही भांडत नाही. उलट एखादा दिवस जर आमच्या दोघींपैकी कोणी गैरहजर राहिली तर दुसरीला अजिबात करमत नाही. बालपणीची ही गोड मैत्री आम्ही अशीच कायम ठेवणार आहोत.

आज शाळेत माझ्या खूप मैत्रिणी बनल्या आहेत परंतु ज्या वेळी मी नवीन आले त्यावेळी माझ्यापुढे मैत्रीचा हात पुढे करणारी माझी ही सुमन नावाची मैत्रीण आहे तिची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेणार नाही हे मात्र तितकेचं खरे आहे. म्हणून मला माझी ही मैत्रीण खूप आवडते आणि आमच्यातील हा मैत्रीचा गोडवा आम्ही नक्कीच कायम टिकवून ठेवू.


आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close