माझा पहिला रेल्वे प्रवास | Majha Pahila Railway Pravas | My First Train Journey Essay In Marathi |
![]() |
माझा पहिला रेल्वे प्रवास. |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण माझा पहिला रेल्वे प्रवास म्हणजेच माझी पहिली अविस्मरणीय रेल्वेयात्रा हा निबंध बघणार आहोत.
गेल्या वर्षीची गोष्ट आहे. दिवाळीच्या सुट्टीत बाबांच्या ऑफिस मधील एका मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंबीय रेल्वेने प्रवास करून दिल्लीला गेलो होतो. आज ही मला तो दिवस स्पष्ट आठवत आहे.
ज्या दिवशी आम्ही प्रवासासाठी निघणार होतो त्या दिवशी मी फारच आनंदी होतो कारण मी पहिल्यादाच रेल्वेने इतक्या लांबचा प्रवास करणार होतो. आजपर्यंत फक्त ऐकूनच होतो की रेल्वेने प्रवास करताना काय काय अनुभव येतात ते परंतु आता मात्र प्रत्यक्षात मला रेल्वेमध्ये बसून जायला मिळणार होते म्हणून माझ्या मनात खूप कुतूहल निर्माण झाले होते.
आमची ट्रेन म्हणजेच रेल्वे संद्याकाळी ४.३० वाजता सुटणार होती. आम्ही जवळपास ४ वाजताच स्टेशन वर पोहोचलो. ट्रेन सुटू नये म्हणून आम्ही स्टेशनवर जरा आधीच येऊन थांबलो होतो.
बाबांनी हातात सामानाची बॅग घेतली होती व आईने माझा हात घट्ट धरून ठेवला होता कारण जसे आम्ही स्टेशन वर दाखल झालो तसें मला एवढी प्रचंड गर्दी बघायला मिळाली की असे वाटले यात मी हरवूनच जाईन. इतके लोक, इकडे तिकडे जाण्याची घाई, कोण या ट्रेनमध्ये चढत आहे तर कोणी त्या ट्रेन मधून उतरत आहे.
मला तर काहीच काळत नव्हते. कोणी भाजीवाले दिसत होते तर कोणी फेरीवाले. रेल्वे स्टेशन वर विविध दुकानें ही होती ज्यात पेपर स्टॉल होते आणि तिथे विविध प्रकारची पुस्तके ठेवली होती. त्याचबरोबर काही खाण्याचे स्टॉल्स ही होते. मोठमोठ्या ट्रेन्स दोन्ही प्लॅटफॉर्म वर ये जा करीत होत्या. मी मात्र आईचा हात घट्टच धरून ठेवला होता.
आमची ट्रेन कधी येते असे मला झाले होते आणि काही वेळातच आमच्या ट्रेनचे आगमन झाले. जशी आमची ट्रेन प्लॅटफॉर्म वर आली तसें स्टेशनवरील माईक वरून तिचे नाव आणि ती कुठे जाणार आहे ह्याची घोषणा झाली. रेल्वे स्टेशन वर एक भले मोठे घड्याळ ही होते ज्यात आता बरोबर ४.३० वाजले होते.
मी आई आणि बाबा आम्ही त्या ट्रेनच्या आत प्रवेश केला आणि बाबा स्वतः जवळील तिकीटीवरून आमच्या सीट्स शोधू लागले. रेल्वेच्या आता इतक्या लांब लांब सीट्स असतात हे मी पहिल्यादा पहिले. एकावर एक अशा ३ सीट्स आमच्या होत्या. मला सर्वात वरच्या सीट्स वर जाऊन बसायचे होते परंतु पहिल्यादा बघितल्यामुळे थोडी भीती ही वाटत होती.
थोड्या वेळाने ट्रेन सुरु झाली आणि त्याचबरोबर माझा पहिला ट्रेनचा म्हणजेच रेल्वेचा प्रवासही सुरु झाला. मी खिडकीजवळ बसलो होतो आणि जसजशी ट्रेन पुढे पुढे जात होती तस तशी थंड हवेची झुळूक मला जाणवत होती. जसजशी ट्रेन पुढे पुढे वेगाने धावत होती तसतशी ट्रेनच्या विरुद्ध दिशेने धावणारी झाडे मला दिसत होती आणि बघून मला खूपच मज्जा येत होती. हळू हळू एक एक स्टेशन जात होते आणि नवीन नवीन प्रवासी ट्रेन मध्ये चढत आणि उतरत होते.
मधल्या वेळेत बाबांनी मला संपूर्ण रेल्वेची सफर करवून आणली आणि आतल्या आत ट्रेन चालू असताना सगळी कडे एक फेरफटका मारून आलो. किती अजब आणि नवीन वाटत होते मला ते सारे! काही खाण्याच्या पदार्थ विकणारे फेरीवाले जसे चहा,कॉफी आणि थंड पेय विकणारे आत फिरत होते तर काही पुस्तके, खेळणीवाले ही रेल्वे मध्ये चढून त्यांची विक्री करीत होते. हे असे सगळे मी पहिल्यांदाच अनुभवले होते.
हळू हळू अंधार पडू लागला आणि प्रत्येकजण आपापल्या घरून आणलेले जेवण काढून जेवू लागले. माझ्या आईने ही आमच्यासाठी घरूनच जेवण बनवून घेतले होते ते आम्ही खाऊन घेतले. काही वेळाने तिकीट तपसण्यासाठी टी. सी.आले व त्यांनी सर्वांच्या तिकीट्स तपासल्या.
आमच्या समोरच्या सीटवर आता काही लोक येऊन बसले होते. ते ही एक कुटुंबच होते आणि त्यांच्याकडील लहान बाळ सारखे रडत होते. आणि त्याला एक मोठा भाऊ होता जो माझ्याच वयाचा होता. हळू हळू आमची चांगली गट्टी जमली व आम्ही चांगले मित्र झालो. खेळण्यासाठी आम्ही दोघे वरच्या सीट्स वर जाऊन बसलो. किती मज्जा येत होती सर्वात वरच्या सीट वरून सर्वाना खाली बघण्यात!
काही वेळाने रात्र झाली आणि आम्ही आपापल्या जागी झोपी गेलो आणि सकाळी एकदम जाग आली तेव्हा कोणते तरी स्टेशन आले होते. प्रचंड गडबड गोधळ सुरु होता. काही प्रवासी उतरून जात होते व काही नवीन प्रवासी आत येत होते.
बाबांनी चहा बिस्कीट घेतले होते ते आम्ही खाल्ले आणि काही वेळातच आमचे स्टेशन ही येणार होते म्हणून आम्ही सामानाची तयारी करायला सुरुवात केली. बाजूच्या सीट्स वरच्या माझ्या नवीन बनलेल्या मित्राच्या कुटुंबाला आमच्या पुढच्या स्टेशनवर उतरायचे होते त्यामुळे तो निवांत बसून होता.
माझ्या या पहिल्या रेल्वे प्रवासात मी खुपश्या गोष्टी पहिल्यांदाच अनुभवल्या होत्या. जसे ट्रेन मधेच एक स्वयंपाकघरही कसे काय असू शकते? ट्रेन मध्ये एक शौचालय ही कसे असू शकते? बसण्याच्या दोन्ही सीट्सच्या मध्ये एक आरसा आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी असलेली चार्जिंग पॉईंट हे सगळे मी फक्त बाबांकडून ऐकले होते परंतु आज चक्क हे सगळे प्रत्यक्षात पाहण्याची वेळ पहिल्यांदाच आली होती.
माझ्या या पहिल्या रेल्वे प्रवासातील प्रत्येक गोष्ट मी खूप कुतूहलपूर्वक पहिली आणि अनुभवली. आणि मग आमचे उतरण्याचे स्टेशन जवळ आले म्हणून मी माझ्या मित्राला बाय करून आई बाबा आणि मी आम्ही तिघे खाली प्लॅटफॉर्मवर उतरलो. परंतु त्या रेल्वेमधून खाली उतरण्याची माझी जराही इच्छा नव्हती. मला माझा हा पहिला रेल्वे प्रवास खूपच आवडला होता. म्हणूनच मी माझा हा पहिला अविस्मरणीय रेल्वे प्रवास कधीच विसरणार नाही.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.