शाळेचा निरोप घेताना | Shalecha Nirop Ghetana | Last Day Of School Essay In Marathi |
"शाळा " हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येतो तो फक्त गोड आठवणींचा सगळा प्रवास. आणि हाच सगळा प्रवास ज्या दिवशी पूर्ण होतो तो शाळेचा शेवटचा दिवस.
मला तो दिवस अजूनही आठवतोय. आमचा निरोप समारंभ म्हणजेच शाळेचा शेवटचा दिवस. आम्ही ईयत्ता दहावी मध्ये शिकत होतो. गेली दहा वर्ष याच शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले होते. आज आमचा निरोप समारंभ आयोजित केला होता.
आम्ही सगळे नवीन कपडे घालून ठरलेल्या वेळेत शाळेत जमलो होतो. मुलगे जॅकेट टाय घालून तर मुली साड्या नेसून आल्या होत्या. त्या सर्वाना बघून विश्वासच बसत नव्हता की हे सगळे आपल्याच ईयत्तेतील मुल - मुली आहेत जे कालपर्यंत आपल्याबरोबर एकाच वर्गात बसून शिकत होते. कारण आज ते सगळे अचानक मोठे दिसू लागले होते. एक एक जण जमू लागले होते. नंतर आम्हा सर्वाना आमच्या शाळेच्या समारंभ हॉल मध्ये एकत्रित बसवण्यात आले.
आम्ही सगळे मित्रमैत्रिणी खूप खुश होतो. हळू हळू सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्या हॉल मध्ये जमा होऊ लागले. मी माझ्या घट्ट मैत्री असणाऱ्या दोन मित्राबरोबर बसलो होतो. आम्हा सर्वांची खूप मजा मस्करी चालू होती. आता आपली शाळा संपणार आणि सगळे कॉलेजला जाणार हा विचार करून करून प्रत्येकजण हुरळून गेले होते. कॉलेजला गेल्यावर खूप मज्जा असते, आपल्याला कोणीही शाळेतल्या शिक्षकांसारखे ओरडत नाही असं आम्ही सर्वांनी ऐकलं होत. म्हणून कधी एकदा कॉलेजला जातोय अशी प्रत्येकालाच घाई झाली होती.
थोड्याच वेळात आमचा निरोप समारंभचा कार्यक्रम सुरू झाला. आमच्या मुख्याधिपिका समोर मंचावर आल्या आणि बोलू लागल्या. त्यांनी आम्हाला पुढील आयुष्यात आम्ही कस वागावं आणि आमच्याकडून काय चुका होऊ नये याबद्दल मार्गदर्शन केल. नंतर आमच्या वर्गशिक्षिका बोलू लागल्या. आणि अचानक मला पहिल्या ईयत्तेच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सगळे प्रसंग डोळ्यासमोर दिसू लागले. याच शाळेत मी बाबाचा हात पकडून दहा वर्षांपूर्वी रडत रडत घाबरलेला आलो होतो तो शाळेचा पहिला दिवस आणि आज शेवटचा दिवस होता.
इतकी वर्ष कधी कशी उडून गेली काहींच कळले नाही. जसं जसे दिवस पुढे जात होते तसतसे नवीन मित्रमैत्रिणी मिळत होते. कधी कौतुक झाले तर कधी प्रसंगी अजाणतेपणी केलेल्या चुकांमुळे मारही खावा लागला तर कधी परीक्षांच्या वेळी वाटलेली भीती हे सगळं डोळ्यासमोर फिरत होते. आमच्या वर्गशिक्षिकांचं भाषण कधी संपलं मला कळलच नाही. हळू हळू एक एक करून काही मुल- मुलीही शिक्षकांविषयी असलेल्या त्याच्या मनातील प्रेम, आदर आणि आपुलकी आपल्या भाषणाद्वारे बोलून दाखवू लागले. जस जसे एकेका विद्यार्थ्यांचे विचार कानावर येत होते तस तसें एकेकाचे मन भरून येत होते.
आल्या आल्या जो आनंद मनात होता तो हळू हळू कमी होत होता आणि त्या जागी आता मला वाईट वाटू लागले होते कारण आता ह्या सगळ्या आठवणीच माझ्याकडे राहणार होत्या पण ही शाळा आणि हे सर्व शिक्षक ह्या सर्वाना आता आम्ही सोडून जाणार होतो. कदाचित हेच मित्र जे आपल्या बरोबर इतकी वर्ष आपल्या सुख दुःखाचे साथीदार होते ते ही आता आपआपल्या पुढच्या प्रवासाला वेगळ्या वाटेने जाणार होते.
माझ्या मनात एक वेगळीच हुरहूर लागली होती. मला रडू येत होत पण थोडया वेळाने मला जाणवलं की माझ्यासारख्या भावना अजूनही काही जणांना जाणवत होत्या. काही मुली तर रडतही होत्या. कोणालाच हा सुखकर प्रवास संपवयचा नव्हता. खूप जण शिक्षकांना धन्यवाद करीत होते आणि रडत होते आणि खूप जण आपआपल्या मित्रमैत्रिणींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी योजना आखत होते. कालपर्यंत जे शिक्षक चुका झाल्यावर ओरडत असत आज ते प्रत्येकाला मायेने जवळ करीत होते. पुढील जीवनातील वाटचालीसाठी आम्हाला ते शुभेच्छा देत होते. काही शिक्षकांचे ही मन भरून आले होते.
थोड्या वेळाने आम्हा सर्वाना नाश्ता दिला गेला आणि आपापल्या कला दाखवयाची संधी दिली गेली जेणेकरून आम्ही सगळे आनंदी राहू आणि जो काही थोडा वेळ एकत्र आहोत त्यात मजा करू. हळू हळू निरोप समारंभ संपण्याची वेळ जवळ आली पण मला मात्र वाटत होत की ती वेळ तशीच थांबून राहावी.
माझ्या शाळेची इमारत बघून माझे मन खूप भरून आले होते. कारण तिथली प्रत्येक जागा जणू काही मला हाक मारत होती. त्या प्रत्येक ठिकाणाशी माझी काही ना काही आठवण जोडली गेली होती. हाच तो माझा वर्ग , हेच ते माझे बाक आणि हाच तो आमचा फळा जणू काही माझ्याकडे बोलू पाहत होते.
हेच ते सभागृह जिथे मी माझे पहिले भाषण केले होते, जिथे मी नाटक केले होते, जिथे मी नृत्य आणि गायन ही केले होते, हाच तो क्रिडांगण जिथे प्रत्येक वर्षी क्रीडामहोत्सव होत असे आणि येथेच मी कबड्डी, खो -खो खेळायचो, हेच ते चिंचेचे झाड जिथे मी चिंच पडायची वाट बघायचो. माझी शाळा आणि हे सगळे प्रसंग डोळे भरून मी बघत होतो. शेवटी सर्व शिक्षकांचा आशीर्वाद आम्ही सर्व मुलांनी घेतला आणि आम्ही आपापल्या घरी निघालो,
आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी आणि निघता निघता मी माझ्या शाळेला हात जोडून वंदन केले की जे काही मी पुढील आयुष्यात प्रगती करीन त्यात माझ्या या शाळेचा खूप मोठा वाटा असेल हाच विचार मनात घेऊन पाणावलेल्या डोळ्यांनी मी घराकडे निघालो. असा हा शाळेचा शेवटचा दिवस मी कधीच विसरणार नाही.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.