Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मी स्कूल बस बोलतेय- स्कूल बसचे आत्मवृत्त - Mi School Bus Boltey - School Busche Aatmavrutta- Autobiography Of A School Bus In Marathi.

मी स्कूल बस बोलतेय | स्कूल बसचे आत्मवृत्त | Mi School Bus Boltey | School Busche Aatmavrutta | Autobiography Of A School Bus In Marathi |




        
मी स्कूल बस बोलतेय- स्कूल बसचे आत्मवृत्त - Mi School Bus Boltey - School Busche Aatmavrutta- Autobiography Of A School Bus In Marathi.
मी स्कूल बस बोलतेय- स्कूल बसचे आत्मवृत्त - Mi School Bus Boltey - School Busche Aatmavrutta- Autobiography Of A School Bus In Marathi.


      


मित्रमैत्रिणींनो, आज आपण स्कूल बसचे मनोगत किंवा स्कूल बसची आत्मकथा बघणार आहोत.


आज शाळेचा शेवटचा दिवस आणि आता यापुढे शाळा पुढील दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे कारण मुलांना आता उन्हाळी सुट्या सुरु होणार आहेत हे लक्षात येताच माझे मन मात्र खट्टू झालेले आहे. आता तुम्हाला वाटेल मी एक शालेय विद्यार्थी किंवा शाळेचे शिक्षक बोलत असेन परंतु तसे मुळीच नाही मित्रांनो! मी तुमच्या या शाळेची बस बोलतेय! होय, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. मी शाळेची बस बोलतेय.

आता तुम्ही सर्व म्हणाल की, जशी आम्हाला आजपासून शाळेला सुट्टी मिळणार तशी तुलाही तर सुट्टी मिळणार. मग तूला रोज ये-जा ये-जा करीत फेऱ्या मारणाऱ्या अश्या प्रवासापासून आराम मिळून मग तू मस्त पैकी एका ठिकाणी शांत सावलीमध्ये उभी राहून दोन महिने आराम करू शकतेस. मग मात्र तू नाराज का?

बरोबर बोललात मित्रांनो. जशी तुम्हाला दोन महिने सुट्टी तशी मलाही दोन महिने सुट्टी. परंतु या दोन महिन्याच्या सुट्टीत तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी फिरावयास जाल कोणी गावी जाल कोणी सहलीला जाल तर कोणी थंड हवेच्या ठिकाणी तर कोणीच समुद्रकिनारी मस्त मज्जा करायला जाल. परंतु मी…. मी मात्र पुढील जवळपास दोन महिने या शाळेच्या बिल्डिंगच्या खाली अशी एकटी शांत तुम्हा सर्व माझ्या छोट्या बाल मित्रांची वाट बघत उभी राहणार. बरोबर ना?

अरे मित्रांनो, मला इथे एका जागी शाळेत उभे राहण्यात आनंद नाही याउलट मला तुम्हाला शाळा ते घर आणि घर ते शाळा असा प्रवास करून नेण्यात आनंद मिळतो. आजही आठवतोय मला तो दिवस ज्यावेळी पहिल्यांदा मला या शाळेत आणले गेले.

तुमच्यासारख्या अनेक छोट्या बाल मित्रांना तुमच्या घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत नेण्या आणण्यासाठी म्हणजे शालेय वाहतुकीसाठी माझी नेमणूक करण्यात आली. नवीन होती मी खूप म्हणून घाबरलेली ही होती. कारण तुमच्यासारख्या छोट्या छोट्या चिमुकल्यांबरोबर माझी मैत्री होऊ शकेल की नाही याचा मला खूप टेन्शन झालं होतं.

हळूहळू मी माझ्या कामांमध्ये पारंगत होत गेले. सुरक्षित ड्रायव्हर आणि जबाबदार कंडक्टर यांच्या मदतीने मी तुम्हा सर्वांना नेऊ आणू शकली.

तुमच्यासारख्या छोट्या छोट्या चिमुकल्यांना त्यांचे आई-वडील माझ्या विश्वासावर शाळेत पाठवू लागले. सुरुवातीला अनेक छोटे छोटे मित्र-मैत्रिणी रडत रडत बसमध्ये येत असत. परंतु मी रस्त्याने सावकाशपणे ये जा करून कधीही कोणाला कोणतीही दुखापत होऊ दिली नाही आणि कोणालाच कोणती ही दुखापत होऊ ही नये याची मी पूर्णपणे स्वतःहून काळजी घेत आलेली आहे.

संपूर्ण वर्षातील कोणताही ऋतू असो उन्हाळा, हिवाळा वा पावसाळा काहीही असो परंतु मी माझ्या वेळेचे बंधन नेहमी पाळत आलेली आहे. माझ्या द्वारे शाळेत आणि शाळेतून घरी वाहतूक करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी मी खूप काळजीपूर्वक पार पाडत आलेली आहे.

माझ्याकडे ड्रायव्हर काकांच्या बाजूच्या सीटवर एक प्रथमोपचाराचा डब्बाच बनवून ठेवलेला आहे. तुम्हा विद्यार्थ्यांची सुरक्षितता हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. म्हणूनच माझ्याकडून अजाणतेपणी जर एखाद्या विद्यार्थ्याला बसमध्ये दुखापत झाली तर त्याला तात्काळ मदत मिळावी म्हणून हा प्रथमोपचार मी नेहमी स्वतःजवळ ठेवते.

आज पर्यंत या बसने अनेक विद्यार्थ्यांनी प्रवास केला आहे. आता मला तुम्हा सर्वांची एवढी सवय झाली आहे की शाळेला सुट्ट्या लागणार आणि दोन महिने मला तुमची भेट होणार नाही हे हे आठवूनच माझे मन फार दुःखी होते.

बस मधील तुम्हा सर्व मित्र-मैत्रिणींच्या त्या किलबिलाटी गप्पा गोष्टी, तुम्हा सर्वांच्या त्या छोट्या छोट्या मोठ्या कुरबुरी, बसमध्ये शिरल्या शिरल्या खिडकीजवळची जागा कोण पटकावणार यासाठी झालेली छोटी मोठी भांडणे, मधल्या सुट्टीत न संपवलेला खाण्याचा डबा एकमेकांना वाटून बसमध्ये वाटून कुटून खातानाचे तुमचे एकमेकांवरील प्रेम , दिवसभरात शिक्षकांनी कोणाला मार दिला, कोणाला ओरडा पडला याबद्दल झालेली तुमच्यातील होणारी चेष्टा मस्करी या सर्वांची मला आता सवय झाली आहे.

रोज ठराविक ठिकाणी बस मध्ये चढणारा एखादा विद्यार्थी जर एखाद्या दिवशी काही कारणास्तव बसने शाळेला आला नाही तर मला त्याची काळजी वाटू लागते. आज तो विद्यार्थी का बरे आला नसेल असा सतत विचार माझ्या मनात येतो. त्याची तब्येत तर ठीक असेल ना? त्याला काही दुखलं खुपले तर नसेल ना? नक्की काय झाले असेल, उद्या तरी तो शाळेला येईल ना असे अनेक विचार माझ्या मनात सतत चालू असतात.

एखाद्या दिवशी जर एखाद्या विद्यार्थ्याला शाळेला तयारी करायला उशीर झाला तर मी त्याची वाट बघून लगेच पुढे निघून जात नाही तर काही वेळ थांबूनच राहते कारण आपले रोजचे छोटे मित्र नेहमी आपल्या सोबतच शाळेत ये-जा करावे अशी माझी मनापासून इच्छा असते.

मला दुरून येताना जेव्हा तुम्ही विद्यार्थी आनंदाने 'माझी बस आली, माझी बस आली' असे बोलता तेव्हा मी मनातून फार सुखावली जाते कारण तुम्ही सर्व छोटे मित्र मैत्रिणी मला तुमची जवळची मैत्रीण समजता आणि मीही तुम्हा सर्वांना माझेच समजते.

तुम्ही छोटे छोटे चिमुकले आपल्या आई-वडिलांची बोट धरून रडत रडत बस मध्ये शिरता परंतु शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक समजूतदार व जबाबदार व्यक्ती बनून शाळेबाहेरील प्रवासाला निघता त्यावेळी मात्र माझे मनापासून तुमच्यासाठी अनेक शुभ आशीर्वाद असतात.

कारण या शाळेच्या छोट्या बसमधून प्रवास करण्याऐवजी तुम्हाला आता खऱ्या आयुष्यातील विविध वाहनांमधून आपल्या पुढील शिक्षणासाठी नोकरी धंद्यासाठी आयुष्यभर प्रवास करावा लागणार असतो हे मला माहित असते म्हणूनच मी भरभरून तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा देते.

परंतु खरं सांगा मित्रांनो, यापुढे आयुष्यात तुमची भरपूर प्रगती होईल, तुम्हाला भरपूर यश ही प्राप्त होईल, आणि तुम्ही अनेक प्रकारच्या महागड्या वाहनातून प्रवास ही कराल परंतु आयुष्याच्या एखाद्या वेळी किंवा एखाद्या क्षणी कधीतरी तुम्हाला तुमची ही शाळेची बस आठवेल का मित्रांनो? हो ना? नक्कीच आठवेल कारण मी तुमच्यावर माया ही तेवढीच केलेली आहे.

तेव्हा तुमच्या पुढील आयुष्यात जेव्हा तुम्ही प्रगतीपथावर तेव्हा तुमच्या रोजच्या धावपळीतून कधीतरी या शाळेला नक्की भेट द्यायला या आणि तेव्हा मला म्हणजेच तुमच्या या लाडक्या बसला ही नक्की भेटायला याल ना?



आमचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

close