माझा आवडता मराठी महिना श्रावण | Majha Aawadta Marathi Mahina Shravan | My Favorite Marathi Month Shravan Essay In Marathi |
![]() |
माझा आवडता मराठी महिना श्रावण |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण माझा आवडता महिना श्रावण महिना हया विषयावर निबंध बघणार आहोत.
महाराष्ट्राची संस्कृती ही विविधतेने नटलेली व निरनिराळ्या सणांनी भरून गेलेली आहे. मराठी नववर्षाची सुरुवातच गुढीपाडव्याच्या सारख्या एका मोठ्या सणाने होते आणि मग मराठी महिन्यांनुसार एक एक सण आणि व्रत-वैकल्य सुरु होतात. परंतु मला मात्र सर्वात जास्त आनंद होतो तो श्रावण महिना सुरु झाला की.
श्रावण महिना माझ्या खूप आवडीचा असा महिना आहे. हा संपूर्ण महिना वेगवेगळ्या सणांनी नटलेला असा महिना आहे. मुळातच श्रावण महिन्याची सुरुवात होते ते आषाढ महिना संपल्यावर व त्यामुळे जेष्ठ - आषाढातील पावसाचा जोर श्रावण महिन्यात काहीसा कमी झालेला असतो आणि वातावरणात व हवेत एक सुखद असा गारवा निर्माण झालेला असतो. निसर्गात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. संपूर्ण वसुंधरेने जणू हिरवी शालच ओढलेली असते.
पावसाच्या सरी मध्ये मध्ये रिमझिम करीत येतात परंतु त्या ही ऊन पावसाचा खेळ खेळीत असतात. त्यामुळे आकाशात कित्येक वेळा आपल्याला इंद्रधनुष्याचे दर्शन करायला मिळते ते याच श्रावण महिन्यात.
मला श्रावण महिना आवडण्याचे अजून एक कारण हे आहे की, श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी माझ्या आईचा श्रावणी सोमवार व श्रावणी शनिवारचा उपवास असतो त्यामुळे त्या दिवशी वेगवेगळे छान छान उपवासाचे पदार्थ मला ही खायला मिळतात. मी ही गेल्या वर्षी माझा पहिला उपवास हा श्रावणताच केला होता परंतु त्या वेळी माझी चांगलीच फजिती झाली होती कारण मला उपवास जमलाच नव्हता.
श्रावणात महिना सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचा यासाठी ही मानला जातो कारण या महिन्यातच एका पाठोपाठ एक सण येत असतात. त्यामुळे घरातील वातावरणही सण वारांचे आणि त्यामुळे आनंदाचे असते. विशेषत : घरातील स्त्रियांसाठी तर श्रावण महिना म्हंटल की आनंदाची पर्वणीच असते. कारण एरवीच्या वेळी विशेष अश्या कामाशिवाय घराबाहेर न पडणाऱ्या स्त्रियांना श्रावणतील सणांच्या निमित्ताने एकमेकींना भेटता येते, एकमेकींना सुख दुःखाच्या दोन चार गोष्टी सांगता येतात.
श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांमध्ये विशेष येणारे सण म्हणजेच रक्षाबंधन, बैलपोळा, गोकुळाष्टमी आणि नागपंचमी हे आहेत. रक्षाबंधनाच्या निम्मिताने स्त्रिया आपल्या माहेरी आपल्या भावाच्या घरी त्याला राखी बांधायला जातात व त्याच निमित्ताने आपल्या माहेरच्याची ही भेट घेतात व तेथे आलेल्या आपल्या इतर माहेरवाशीण मैत्रिणीनाही भेटतात.
बैलपोळा हा सण तर माझा खूपच आवडता आहे कारण या दिवशी आपण आपल्या घरच्या बैलाची पूजा करतो. त्याला चांगले सजवतो आणि त्याला चांगले खाऊ घालतो. या दिवशी शेतकरी हे आपल्या घरातील बैलाला दिवसभर आराम देतात. त्या दिवशी त्याच्याकडून कोणतेही काम करवून घेतले जात नाही. माझा आवडता प्राणी बैल हा आहे त्यामुळे मी गेल्या वर्षी बैलपोळ्याच्या दिवशी माझ्या गावी गेलो होतो म्हणून मी हा सण जवळून बघू शकलो.
श्रावणात येणारा सर्वात लोकप्रिय आणि जल्लोषचा सण म्हणजेच गोकुळाष्टमी हा आहे. गोकुळाष्टमी हा सण सर्वत्र महाराष्ट्रात खुप उत्साहात साजरी करण्याची प्रथा आहे. गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी श्रीकृष्ण जन्मष्टमीचा उपवास करण्याची पद्धत आहे. माझी आई ही गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी उपवास करते आणि मग आम्ही सर्व कुटुंबीय मिळून त्याच दिवशी रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतो.
दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव लोक खूप आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. यावेळी एकावर एक उंचच्या उंच मानवी थर लावले जातात व उंचावरील बांधलेली हंडी फोडण्याचा मान पटकविण्यासाठी अनेक लोकांनी केलेली चढाओढ आपल्याला बघायला मिळते. या साठी लोक कित्येक दिवस आधीपासून सराव करीत असतात.
श्रावण महिन्यात येणारा अजून एक विशेष सण ज्याचे मला अगदी लहापाणीपासुनच कुतूहल आहे तो म्हणजे नागपंचमी हा सण. हया दिवशी महाराष्ट्रातील काही भागात नागाची पूजा केली जाते. आम्ही मुले ही आमच्या शाळेत मातीच्या नागाच्या कलाकृती नेऊन त्याला आपापल्या बाकावर ठेऊन त्याची आमच्या वर्गशिक्षकांच्या सल्ल्याने पूजा करतो. त्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहतो. हे सर्व करताना आम्ही सर्व विद्यार्थी खूप आनंदी असतो.
असे एक एक करून या श्रावण महिन्यात अनेक सण आणि त्यांची विशेष अशी गोडी आपण घेत असताना हा महिना आपल्याला इतर महिन्यांपेक्षा निश्चितच लहान वाटतो व कधी संपून जातो ते कळतच नाही.
श्रावण महिना म्हणजेच उल्हासाचा, उत्साहाचा आणि सण वारांचा महिना. उपास तापासांचा महिना, व्रत वैकल्यांचा महिना, पूजेअर्चेचा महिना आणि सर्वात महत्वाचा म्हणजेच माझा सर्वात आवडता असा महिना आहे.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.