माझा पहिला उपवास | Majha Pahila Upavas | My First Fast Essay In Marathi |
![]() |
माझा पहिला उपवास - Majha Pahila Upavas. |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण माझा पहिला उपवास किंवा मी केलेला पहिला उपवास या विषयावर निबंध बघणार आहोत.
आपण सर्वच जण कधी ना कधी तरी नेहमी आपल्या आईच्या तोंडून एक वाक्य ऐकतो की आज माझा उपवास आहे आणि ज्या दिवशी आई असे म्हंटते त्या दिवशी ती काहीही खात नाही. हो ना? असेच मी ही नेहमी बघायचो की माझी आई नेहमी उपवास करते आणि गेल्या वर्षी पासून तर माझी मोठी ताई पण उपवास करू लागली म्हणून मी ठरवले की मी ही उपवास करून बघणार. म्हणून मी आई ला सांगून ठेवले की मला पण उपवास करायचे आहे. तेव्हा आई माझ्याकडे बघून हसली आणी म्हणाली की ठीक आहे या वर्षी तू श्रावणात येणारे उपवास कर. आई असे म्हणाली आणि मला खूपच आनंद झाला.
काही दिवसांनी श्रावण महिना सुरु झाला. आई ने मला मुद्दामहून आठवण करून दिली की या वेळी तू ही उपवास करणार आहेस. मी आनंदाने हो म्हंटले कारण मी ही आई आणि ताई जश्या उपवास करतात तसा उपवास करण्यास फारच उत्सुक होतोच. मला अजूनही आठवतो तो दिवस. श्रावणातील पहिला सोमवार होता. सकाळी उठल्यावर आई म्हणाली की आज तुझा उपवास आहे विसरू नकोस बरं का? मी ही मोठया ऐटीत होकार दिला.
सकाळी मी फक्त दूध पिऊन शाळेसाठी गेलो. डब्यात आई ने आज नेहमीसारखे भाजी पोळी किंवा उपमा, कांदे पोहे, इडली यामधील काहींच न देता साबुदाण्याची खिचडी दिली होती. आज मी दिवसभर उपवास करून दाखवणारच असे मनात ठरवून मी शाळेत आलो. शाळेचे एक एक तास संपत होते परंतु माझे लक्ष काही केल्या अभ्यासात लागत नव्हते. घरातून निघताना माझा उपवास असल्याकारणाने मी सकाळी काही नाश्ता केला नव्हता. म्हणून मला थोडी थोडी भूक लागल्यासारखी जाणवत होती. परंतु मी थोडे दुर्लक्ष केले पण काही वेळाने मात्र मला खुप भूक लागू लागली होती.
आज माझ्या वर्गातील एका मित्राचा वाढदिवसही होता त्यामुळे त्याने आम्हाला सर्वाना देण्यासाठी चॉकलेट्स ही आणले होते. सर्वानी ते तेव्हाच खाल्ले परंतु मी मात्र ते चॉकलेट माझ्या दप्तरात ठेवले कारण उपवास असल्याकारणाने मी ते तेव्हा खाऊ शकत नव्हतो.
कधी एकदा मधली सुट्टी होते आणि मी माझा डब्बा खातो असे मला झाले होते. शेवटी एकदाची शिपाई काकांनी मधली सुट्टीची घंटा वाजविली आणि मग मी पटापट माझ्या दप्तरातून माझा डब्बा उघडून खिचडी खाऊ लागलो. परंतु मला ती उपवासाची खिचडी खाण्यात लक्ष लागत नव्हते कारण माझ्या वर्गातील माझ्या इतर मित्रांनी डब्ब्यात पोळी भाजी, इडली, पोहे असे खमंग पदार्थ आणले होते. मला खिचडी खाल्ली जात नव्हती परंतु मी माझ्या इतर मित्रांच्या बाकावरील जे डब्बे होते ते पदार्थ खाऊ शकणार नव्हतो कारण माझा तर उपवास होता आणि ते पदार्थ उपवासाला चालणारे नव्हते. शेवटी कशी तरी थोडीशी खिचडी मी संपवली आणि शाळा सुटण्याची वाट पाहू लागलो.
काही वेळाने शाळा सुटली आणि स्कूल बस मध्ये बसताना शाळेच्या कॅन्टीन मधून वडा पाव आणि समोस्याचे खमंग वास येऊ लागले. आता मात्र मला खूपच भूक लागली होती. आपण केलेला उपवास आपल्याला आता जमेनासा होत आहे हे हळू हळू माझ्या लक्षात येऊ लागले होते.
जशी शाळा सुटली तसे माझ्या सायकलीवरून कसा बसा मी घरी पोचलो कारण तेव्हा भुकेमुळे अंगात त्राण राहिला नव्हता व मी रडकुंडीला आलेलो होतो. माझा चेहरा बघुन आईने लगेच ओळखले की मला काही उपवास जमत नाही वाटते.
आईने मला विचारले काय मग? कसा जात आहे आजचा उपवासाचा दिवस? फळ आणते ते खाऊन घे कारण उपवासाच्या दिवशी रात्री जेवावे लागते. हे ऐकताच मी घाबरलो कारण आत्तासा फक्त अर्धा दिवसच संपला होता अजून अर्धा दिवस बाकी होता. आणि मला मात्र खूपच भूक लागली होती.
मी आई ला म्हंटले की नको बाबा! मला नाही जमणार हा उपवास. मला भूक लागली आहे मी आता जेवणार. हे ऐकताच आई आणि ताई दोघी हसायला लागल्या कारण माझा पहिला उपवास होता आणि मला काही भूक सहन झाली नाही त्यामुळे माझी आज चांगलीच फजिती झाली होती.
थोड्याच वेळात आईने चविष्ट असे माझ्या आवडीचे जेवण करून मला खायला दिले आणि मी ते पटापट संपविले आणि मी केलेला हा पहिला उपवास मी अर्ध्या दिवसातच संपविला. अशी ही माझ्या पहिल्या उपवासाच्या दिवशी झालेली माझी ही फजिती मी कधीच विसरणार नाही.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.