मी शाळेचा गणवेश बोलतोय | Mi Shalecha Ganvesh Boltoy | Autobiography Of School Uniform Essay In Marathi.
![]() |
मी शाळेचा गणवेश बोलतोय. |
मित्रमैत्रिणींनो, आज आपण शाळेच्या गणवेशाची आत्मकथा किंवा शाळेच्या गणवेशाचे मनोगत या विषयावरील निबंध बघणार आहोत.
उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि पावसाळा सुरु होताच मला आता शाळा सुरु होण्याचे वेध लागले. शाळा सुरु होणार म्हणजेच नवीन पुस्तके, नवीन दप्तर, नवीन छत्री आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजेच या वर्षी मला माझ्या आईकडून शाळेचा नवीन गणवेश (School Uniform) विकत घेऊन हवा होता म्हणून मी तिच्या मागे सतत हट्ट करीत होतो.
आई मला समजावत होती की गेल्याच वर्षी तिने मला नवीन गणवेश आणून दिला होता तो अजूनही सुस्थितीतच आहे मग नवीन गणवेशची गरज नव्हती. मी नाराज होऊन कपाटातून माझा शाळेचा गणवेश बाहेर काढला व त्याला तिथेच त्याला ठेऊन दिला. एवढ्यात आवाज आला, "ऐकलंस का मित्रा! मी तुझा शाळेचा गणवेश बोलतोय!" मी जरा दचकूनच पाहिले तर माझा शाळेचा गणवेश माझ्याकडे बोलत होता. अरे मित्रा, मी तुझा शाळेचा गणवेशच बोलतोय. आज मी तुला माझे मनोगत सांगणार आहे.
गेल्या वर्षी असेच तुझ्या शाळेच्या पहिल्या दिवशीपासून घालण्यासाठी तू मला विकत घेतले होतेस. त्यावेळी मी किती कडक आणि कोरा होतो. माझा गडद आणि आकर्षित करणारा रंग किती उठावदार दिसत होता. तू जेव्हा मला घातलेस तेव्हा मी तुझ्यावर खूपच खुलून दिसत होतो. त्यावेळी तर तू खूपच खुश होतास.
आम्हा गणवेशांचे वैशिष्ट्यच हे आहे की, आम्ही सर्व विदयार्थ्यांमध्ये समानता दिसून यावी म्हणूनच वापरले जातो. शाळेत येणारी मुले ही वेगवेगळ्या स्थरावरून येत असतात. त्यातील काही गरीब परिस्थिती असलेल्या घरातूनही येतात तर काही सुखवास्तु कुटुंबातील ही येतात. अश्या वेळी जर गणवेश नसेल तर काही मुले रोज छान छान नवीन नवीन कपडे घालून शाळेत येऊ लागली असती तर काही मुले घरचे साधे कपडे घालून शाळेत येऊ लागली असती. आणि त्यामुळे मग अनावधानाने तुम्ही सर्व मुले एकमेकांना त्याच्या कपड्यांवरुन त्यांच्या परिस्थितीवरून भेदभाव करू शकता. परिणामी गरीब मुले आणि श्रीमंत मुले असे वर्गात दोन भाग झाले असते. आणि मग तुम्हा विदार्थ्यांमध्ये खरी निखळ मैत्री ही कधीच होऊच शकली नसती म्हणून आमची म्हणजेच गणवेशाची संकल्पना अस्तित्वात आली असावी असे मला वाटते.
शाळेचा गणवेश हा घातल्यावरच आपण एक परिपूर्ण विद्यार्थी म्हणून दिसण्यात येतो. शाळा भरते तेव्हा सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात किती शिस्तीत आणि तालबद्ध दिसतात. गणवेश मग तो कोणता ही का असो तो शाळेचा गणवेश असो किंवा पी.टी. चा गणवेश असो त्यात एकसमान लय बद्धत्ता दिसण्यात येते.
तुम्ही मुले जेव्हा क्रीडांगणावर एकसमान गणवेश घालून व्यायाम करता, निरनिराळे खेळ खेळता, क्रिडा महोत्सव साजरा करता तेव्हा खरे आमचे गणवेशाचे महत्व दिसण्यात येते.
अरे मित्रा! मी गणवेष गेली कित्येक वर्षें तुम्हा विदयार्थ्यांना साथ देत आलोय. पूर्वी शाळेचे गणवेश हे टेलर कडून शिवून घ्यावे लागायचे. त्यामुळे आई वडील मुद्दामच थोडे मोठ्यां मापाचे कपडे मुलांसाठी शिवून घ्यायचे जेणेकरून किमान दोन ते तीन वर्षे तरी तो गणवेश मुले चांगल्या प्रकारे शाळेत वापरू शकतील.
पूर्वी प्रत्येकाचीच परिस्थिती तशी बेताची असल्यामुळे कित्येक वेळा मोठया भावंडांना लहान होणारे गणवेश लहान भावंडे ही आवडीने वापरीत असायचे. परंतु नंतर काळ बदलत गेला आणि शैक्षणिक पद्धतीमध्ये ही अमूलाग्र बदल निर्माण होऊ लागले. मग आम्हा गणवेशाला टेलरकडून शिवून न घेता तुम्ही परस्पर शाळेतून विकत घेऊ लागलात. त्यामुळे वेगवेगळ्या शाळांचे वेगवेगळे गणवेश मिळू लागले.
काळानुसार आधुनिक जीवनशैलीमध्येही बदल होऊ लागला आणि पालकांची आर्थिक स्थिती चांगली होत गेल्यामुळे व कमी मुले असल्यामुळे तुम्हा आताच्या पिढीच्या मुलांना प्रत्येक वर्षी नवीन गणवेश हवा असतो आणि त्यासाठी तुम्ही हट्ट करता आणि कित्येक पालक तो हट्ट पूरवितात ही.
आज तू ही आईकडे नवीन गणवेशासाठी हट्ट करीत आहेस परंतु मी ना ही कुठे फाटलो आहे आणि ना ही मळका झालो आहे. उलट तू शनिवारी शाळेतून घरी आलास की दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याकारणाने दप्तर बाजूला टाकून याच गणवेशावर कित्येक वेळा घराशेजारील क्रिडांगणावर खेळायला गेला आहेस.
अरे मित्रा, आज तुला मी सुस्थितीत असलेला गणवेश नको झालो आहे परंतु कित्येक गरीब मुलांना बघ जे फाटके आणि मळके गणवेश ही घालून आपली शाळा पूर्ण करण्याची धडपड करीत आहेत.
मित्रा, गणवेश हा फक्त एक पोशाख आहे जो तुम्हा सर्व विद्यार्थांमध्ये एकसामानता टिकवून ठेवण्यासाठी व कोणीही उच्च अथवा निच्च नसून शाळा हे विद्येचे मंदिर आहे आणि तिथे सर्व विद्यार्थी हे एकसमान आहेत हे दर्शविण्यासाठी सर्वाना सामान गणवेश घालून येण्याची संकल्पना केली आहे. शेवटी शिक्षण हेच महत्वाचे आहे हे तुला विसरून चालणार नाही.
तेव्हा मी तुझा शाळेचा गणवेश तुझ्याकडे एवढीच विनंती करतो की, शाळेच्या गणवेशला नेहमी महत्व दे परंतु तो गणवेश तुला जी सामानतेची शिकवण शिकवितो ती शिकवण तू कधीच विसरू नकोस व तुझ्या बरोबरीच्या इतर मित्रांबरोबर ही नेहमी समानतेने आणि प्रेमाने वागत जा आणि तुझे शालेय जीवन आनंदाने पूर्ण कर.
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.