अशी झाली माझी फजिती | Ashi Jhali Majhi Fajiti | In This Way My Embarrassed Moment Happend Essay In Marathi |
![]() |
अशी झाली माझी फजिती - Ashi Jhali Majhi Fajiti - In This Way My Embarrassed Moment Happened Essay In Marathi. |
एप्रिल महिना उजाडला आणि माझ्या शाळेच्या सूचना फलकावर यंदाच्या आमच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लावले गेले. त्या सूचना फलकाकडे बघत बघत माझ्या मनात विचार येत होते की पुन्हा परीक्षा? आताच तर होऊन गेली ना एक परीक्षा. या परीक्षाच नसत्या तर…. काय मज्जा आली असती ना? पण आपण फक्त अशी कल्पनाच करू शकतो प्रत्यक्षात मात्र काहीही झाले तरी परीक्षा देणे हे मला अपरिहार्यच होते हे मला चांगलेच कळले होते.
शाळा सुटल्यावर सर्वांनी वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक आपापल्या वहीवर लिहून घ्यायचे आहे असे आम्हाला आमच्या वर्गशिक्षकांनी सांगितले होते म्हणून शाळा सुटल्यावर मी ही माझ्या मित्रांसोबत वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लिहिण्यासाठी सूचना फलकाकडे जाऊन उभा राहून ते घाई घाईने लिहून घेत होतो.
वेळापत्रक लिहून घेण्यासाठी तेथे इतरही अनेक विद्यार्थांची गर्दी जमा झाली होती आणि त्यात मी कसाबसा पटापट ते लिहून घेत होतो कारण त्यानंतर लगेचच मला माझ्या मित्रांसोबत शाळेतील क्रिडांगणावर क्रिकेट खेळायला ही जायचे होते. म्हणून जसे जमेल तसें मी लगेचच सारे वेळपत्रक त्याच्या दिनांक व वारासकट लिहून घेतले आणि माझी वही दप्तरामध्ये ठेऊन क्रिडांगणावर खेळायला गेलो.
परीक्षा पुढील चार दिवसानंतर सुरु होणार होती म्हणून मी वहीमध्ये जेव्हापासून वेळापत्रक लिहून घेतले त्यानंतर त्याकडे पुन्हा पाहिलेच नव्हते. एकदा लिहितानाच घाई घाईने ते संपूर्ण वाचून घेतले होते.
परीक्षा सोमवार पासून सुरु होणार व आम्हाला शनिवार - रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे आता आपण अगदी परीक्षेच्या दिवशीच एकमेकांना भेटणार म्हणून आम्ही सर्व मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना शुक्रवारीच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व आपापल्या घरी निघून गेलो.
घरी आल्यावर परीक्षेला अजून दोन दिवस अवकाश असल्यामुळे मी खेळण्यासाठी बाहेर निघताच आईने मला परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी घरीच थांबण्यासाठी सांगितले व पहिला पेपर कोणता आहे याची विचारपूस ही केली.
परीक्षा सोमवारपासून सुरु होणार हे नक्किच होते परंतु मी ज्या वहीत माझ्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लिहून आणले होते त्यावर आधीच घाई घाईने वाचलेला विषय माझ्या लक्षात ठेवून होतो की माझा पहिला पेपर हा संस्कृत विषयाचा आहे त्याप्रमाणे मी आईला सांगितले की माझा पहिला पेपर हा संस्कृत विषयाचा आहे व संस्कृत विषयाची तशी माझी बऱ्यापैकी उजळणी आधीच झाली होती हे आईला ही माहीत होते.
पहिला पेपर हा माझ्या आवडत्या विषयाचा म्हणजेच संस्कृतचा होता व माझा त्यावरील सराव चांगला झालेला होता म्हणून मी थोड्या वेळासाठी आईला विचारून खेळायला गेलो.
शनिवारची सुट्टी मी आराम करण्यातच घालविली व रविवारी मात्र आईने मला डटावले की रविवारी पूर्ण दिवस सोमवारच्या परीक्षेसाठी तयारी करून घे म्हणून मी माझ्या संस्कृत विषयाची सगळी उजळणी उत्तम प्रकारे केली.
रविवारी रात्री आईने मला पुन्हा-पुन्हा विचारले की वेळापत्रक नीट पाहूनच अभ्यास केला आहेस ना? परंतु वहीमधील वेळापत्रक न बघता मी फारच आत्मविश्वासाने आईला सांगितले की मी नीट वाचलेले आहे की उदया संस्कृतचाच पेपर आहे. तरीही आईने माझ्याकडे माझे वेळापत्रक वाचण्यासाठी मागितले ही परंतु मी आळसपणा केला आणि तिला थोड्या वेळाने देतो असे सांगून टाळले.
अखेर परीक्षेचा दिवस उजाडला आणि मी मोठ्या आत्मविश्वासाने शाळेकडे निघालो होतो. घरातून निघताना आईने मला पुन्हा एकदा उजळणी करण्यास सांगितले असता मला सगळे येते आहे व मला काहीही वाचण्याची आवश्यकता नाही असे म्हणून मी जरा आरामातच शाळेकडे निघालो.
रस्त्यातून जाताना मी खूष होतो कारण आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी माझ्या आवडत्या विषयाचा पेपर होता. शाळेत पोहचताच शिपाई काकांनी शाळा भरल्याची घंटा वाजविली आणि इतक्यातच मला माझा मित्र ही भेटला.
आम्ही दोघे परीक्षेचा अभ्यास व उजळणी कशी झाली आहे ह्याची एकमेकांकडे चौकशी करू लागलो. तेव्हा माझा मित्र मला गणिताची प्रमेये आणि काही काही गणिताच्याच शंका विचारू लागला. त्याने विचारलेल्या शंका ऐकून मला लगेचच मोठ्याने हसू आले व मी त्याची मस्करी करून बोलू लागलो की संस्कृतच्या पेपरला कोणती गणिते तो सोडविणार आहे?
माझा असा प्रश्न ऐकून त्याला आश्चर्य वाटले व तो घाबरून पुन्हा पुन्हा त्याच्या वहीतील लिहिलेले परीक्षेचे वेळापत्रक पाहू लागला. एक दोन वेळा त्याने ते नीट तपासून पहिले व पटकन तो शाळेच्या सूचना फलकाच्या दिशेने धावला.
मला काहीच कळत नव्हते की तो असा अचानक चलबिचल का झाला होता. परंतु काही क्षणातच तो शांतपणे माझ्याजवळ आला आणि माझ्याकडे बघून जोर-जोरात हसू लागला. माझा मित्र संस्कृतच्या पेपरला गणिते विचारत होता म्हणून मी त्याला हसलो तर आता पुन्हा तो मला का बरे हसत असेल असे मला वाटले इतक्यातच त्याने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच नाहीशी झाल्यासारखे मला वाटले.
होय, तो मला म्हणाला की आज संस्कृतचा पेपर नसून गणिताचा पेपर आहे. पहिल्यांदा मला वाटले की तो माझी मस्करी करीत असेल परंतु त्यानंतर मात्र तो मला शाळेच्या सूचना फलकाजवळ घेऊन गेला व त्याने मला आजच्या पेपरकडे बोट करून दर्शविले व आता तो माझ्याकडे बघून जोर-जोरात हसू लागला त्यावेळी मात्र मला घाम फुटला.
अति आत्मविश्वास व आळसामुळे त्याचबरोबर आईचे ही न ऐकल्यामुळे आज माझी खूप मोठी फजिती झाली होती. एक एक करून माझ्या सर्व मित्रांना कळले होते की मी गणिताच्या पेपरच्या ऐवजी संस्कृतचा अभ्यास करून आलेलो आहे. मला काय करावे काहीच सुचत नव्हते व अक्षरशः मला रडू कोसळू लागले होते.
अश्या वेळी माझ्या मित्रांनी मला माझी अशी अवस्था पाहून धीर दिला व गणिताची काही महत्वाची प्रमेये मला समजून सांगितले जेणेकरून मी ठराविक गणिताच्या पद्धतींची लगेचच उजळणी करून आजचा गणिताचा पेपर सोडविण्यासाठी थोडासा मानसिकरित्या आत्मविश्वासी होऊ शकेन.
शाळेची पेपर सुरु होण्याची शेवटीची घंटा वाजेपर्यंत मी महत्वाची गणिते पटापट उजळणी करू लागलो आणि सर्वात शेवटी घाबरत घाबरत वर्गात जाऊन पेपर सोडविण्यास बसलो.
आजचा पेपर तर मी नीट सोडविला आहे परंतु आज जी माझी फजिती झाली आहे ती मात्र मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. तर अशी झाली माझी फजिती!
आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.
0 टिप्पण्या
Please do not enter any spam link into comment box.